glenn maxwell and vini raman : ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची महत्त्वाची भूमिका राहिली. अंतिम सामन्यात मॅक्सवेलला जास्त वेळ फलंदाजीची संधी मिळाली नाही पण त्याने गोलंदाजीत कमाल केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपल्या जाळ्यात फसवून मॅक्सवेलने भारताला मोठा धक्का दिला. कांगारूंचा संघ चॅम्पियन होताच मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी विनी रमणला काही चाहत्यांनी लक्ष्य केले. ऑस्ट्रेलियाने जग्गजेतेपद पटकावल्यानंतर विनी रमणवर काही चाहत्यांनी खालच्या पातळीवर टीका केली. चाहत्यांच्या आक्षेर्पाह पोस्ट पाहून विनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत अशा अतिउत्साही चाहत्यांना शांत राहण्यासाठी गोळी घेण्याचा सल्ला दिला.
चाहत्यांनी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर मॅक्सवेलच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "हे सांगण्याची गरज भासते यावर विश्वास बसत नाही... पण तुम्ही भारतीय असू शकता, ज्या देशात जन्म घेतलाय त्याचे तुम्ही नक्कीच समर्थन करा. कारण इथेच तुमचे पालनपोषण झाले आहे आणि यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या संघाकडून तुमचा पती आणि आपल्या मुलाचे वडील खेळत आहेत. एक थंड गोळी घ्या आणि तुमचा आक्रोश इतरत्र जागतिक समस्यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर काढा." एकूणच मॅक्सवेलची पत्नी भारतीय वंशाची असून तिने ऑस्ट्रेलियाचे समर्थन केल्याने काही अतिउत्साही चाहत्यांनी किंबहुना प्रसिद्धी मिळवणाऱ्यांनी तिच्याबाबतीत आक्षेपार्ह पोस्ट केल्या. याशिवाय ट्रॅव्हिस हेडची पत्नी व मुलीला बलात्काराची धमकी देण्याचा लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला.
ॲास्ट्रेलियाच 'हेड'मास्तर! दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.
मॅक्सवेलची स्फोटक खेळीभारताविरूद्धच्या अंतिम सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला फार काळ फलंदाजीची संधी मिळाली नाही. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबूशेन यांची खेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी पुरेशी ठरली. पण, मॅक्सवेलने साखळी फेरीतील अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात एकतर्फी झुंज देऊन आपल्या संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम ठेवले. खंर तर अफगाणिस्तानविरूद्ध २०१ धावांची नाबाद खेळी करून मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या तोंडचा घास पळवून विजय हिसकावला होता.