- अयाज मेमन
कन्सल्टिंग एडिटर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधून भारतीय क्रिकेटने २०२० या वर्षाचा शेवट चांगला केला. पहिल्या कसोटीतील कामगिरी पाहता भारतावर ‘व्हाईटवॉश’ची वेळ येईल, असे दिसत होते. मात्र, टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन केले. आता कांगारुंचीही भीती वाढली आहे. काही दिवसात चित्र बदलेल, असे कुणाला वाटलेही नसेल. ॲडिलेडमध्ये भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर कोसळला होता. ही कामगिरी आत्मविश्वासाला तडे देणारी होती.
विराट कोहली, मोहम्मद शमी असे मुख्य खेळाडू नसताना संघ कसा दबाव सहन करेल, असा प्रश्न होता. मात्र, उत्कृष्ट सांघिक कामगिरीने चित्र बदलले. बुमराह, आश्विन आणि जडेजा यांचे काैशल्य आणि अनुभव तसेच शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचे जबरदस्त पदार्पण तसेच महत्त्वाकांक्षी असलेल्या रहाणेने संघाला विजय मिळवून दिला. फलंदाज आणि कर्णधार म्हणून रहाणे हा अनुकरणीय ठरला. काही दिवसांपूर्वी त्याच्या करिअरमध्ये चढ-उतार आले. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून तो दूर राहिला. लाल चेंडूने तो मोठ्या खेळी करू शकला नाही. मात्र, गुलाबी चेंडूने खेळताना त्याने कमाल केली. मेलबर्नमधील शतक आणि नेतृत्वगुणामुळे त्याच्यावरील टीकेची झोड कमी झाली.
मेलबर्नमधील या दुसऱ्या कसोटी सामन्याचा विजय भारतीय क्रिकेटसाठी मान उंचावणारा ठरला. कारण ही कामगिरी २०२१ मध्ये होणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशीपमधील भारताच्या आशा कायम राखण्यासाठी मदतपूर्ण ठरली. विश्व कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम दोन स्थानांबाबत मी यापूर्वीच लिहिले आहे. न्यूझीलंडने सत्र गाजवले. हा संघ पहिल्या आणि दुसऱ्या स्थानाजवळ पाेहचला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: A glimpse of Rahane's leadership, a look at performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.