कॅनडा : भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर युवराज कॅनडात होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 आणि युरो ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार आहे. ग्लोबल ट्वेंटी-20 लीगच्या चषकाचे बुधवारी अनावरण करण्यात आले. यावेळी युवराजसह वेस्ट इंडिजचा युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल हाही उपस्थित होता. आजपासून या लीगला सुरुवात होणार आहे आणि पहिल्याच सामन्यात युवराज विरुद्ध गेल असे युद्ध पाहायला मिळणार आहे. युवराज हा टोरोंटो नॅशनल संघाचे प्रतिनिधित्व करतो, तर गेल हा व्हँकोव्हर नाइट्सकडून खेळणार आहे. या लीगचा सलामीचा सामना उभय संघांमध्येच होणार आहे. या सामन्यापूर्वी युवी आणि गेल यांनी एकमेकांना चॅलेंज केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात कोण बाजी मारतो, याची उत्सुकता लागली आहे. युवीच्या संघात ब्रँडन मॅकलम, किरॉन पोलार्ड आणि मिशेल मॅक्लेघन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले खेळाडू आहेत. तर गेलच्या मदतीला शोएब मलिक, आंद्रे रसेल, टिम साऊदी हे दिग्गज आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 10 वाजता सुरु होणार आहे.युवराजच्या चाहत्यांसाठी खूशखबर; कॅनडानंतर आणखी एका लीगमध्ये करणार फटकेबाजी!भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नसल्यामुळे युवीनं आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मुळात त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी हवी होती आणि त्यासाठीच त्यानं निवृत्ती पत्करली. आता ग्लोबल ट्वेंटी-20 लीगनंतर युवी युरो ट्वेंटी-20 लीगमध्येही खेळणार असल्याचे समजत आहे. ही लीग आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथे 30 ऑगस्ट व 22 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.
या लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीही खेळणार आहे. शिवाय ख्रिस लीन, बाबर आजम, ल्युक राँची, जेपी ड्यूमिनी यांचाही सहभाग असल्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथील प्रत्येकी दोन संघ या लीगमध्ये खेळणार आहेत.