- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)आयपीएल सुरू होऊन आठ-दहा दिवस झालेत; परंतु या स्पर्धेची रंगत आतापासूनच कमालीची वाढलेली दिसून येत आहे. आतापर्यंत सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. त्यातील बहुतांश सामने हे अंतिम षटकापर्यंत रंगले. प्रत्येक सामन्याचा निकाल अत्यंत धक्कादायक लागलाय. बरेच उलटफेर झालेत. मुंबई इंडियन्स, जो गतविजेता संघ आहे, त्यांना सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत त्यांनी संघर्ष केला असला तरी पराभवापासून ते वंचित राहिले नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेही घरच्या मैदानावरील सामने गमावले. अशीच परिस्थिती आपल्याला कोलकाता नाइट रायडर्सची झालेली दिसली.चेन्नईच्या संघाने आपले सुरुवातीचे दोन सामने जिंकले असले तरी तिसऱ्या सामन्यात धोनीच्या फटकेबाजीनंतरही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एकंदर पाहता, जे दिग्गज संघ मानले जात होते, त्यांच्याकडून चाहत्यांची निराशा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स हे संघ मात्र चांगले प्रदर्शन करीत आहेत. आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादने आपली छाप सोडलेली आहे. कारण हा संघ संतुलित दिसतो. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व यामध्ये हा संघ आतापर्यंत सरस ठरला आहे. यावरून असे दिसून येते की जिंकण्यासाठी दिग्गज खेळाडू किंवा दिग्गज संघ असणे गरजेचे नाही, तर संघात समतोल आवश्यक आहे.आतापर्यंत बहुतांश दिग्गज खेळाडू अपयशी ठरलेत. रोहित शर्माला अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही. विराट कोहलीची एका सामन्यातील खेळी सोडली तर त्याच्याकडूनही म्हणावे तसे प्रदर्शन झालेले नाही. एबी डिव्हिलियर्स, गौतम गंभीर, पोलार्ड हे दिग्गज खेळाडू आपल्या नावाला साजेशी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरले आहेत. ख्रिस गेल आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. पहिल्या दोन सामन्यांत मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरलेल्या धोनीने मात्र कालच्या खेळीने आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रवींद्र जडेजा हे दिग्गज आतापर्यंत संघर्ष करताना दिसून आले आहेत. रविचंद्रन आश्विनने आपली नेतृत्व क्षमता दाखवून दिली असली तरी त्याची वैयक्तिक कामगिरी प्रभाव टाकू शकली नाही. यावरून दिग्गज खेळाडूंवर कमालीचा दबाव दिसून येतो. परंतु, युवा खेळाडूंचे प्रदर्शन पाहिल्यास त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे.खास करून गोलंदाज आपली छाप पाडण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. भुवनेश्वर कुमार हैदराबादसाठी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. तसेच अनेक फिरकीपटू आतापर्यंत वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामध्ये राशिद खान आणि मुजिबूर रहेमान या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. तर आरसीबीच्या युजवेंद्र चहलचेही प्रदर्शन आतापर्यंत चांगले राहिले आहे. परंतु आतापर्यंत ज्या खेळाडूने सर्वांत जास्त प्रभावित केले आहे, तो म्हणजे मयंक मार्कंडेय. मुंबईकडून खेळणाºया या युवा खेळाडूचे आतापर्यंतचे प्रदर्शन अंत्यत प्रभावशाली राहिले आहे. कोलकातामधील सुनील नारायणशिवाय कुलदीप यादवसुद्धा यशस्वी ठरत आहे. एकंदरीत, आयपीएलमध्ये गोलंदाजीत फिरकीपटू आणि युवा खेळाडूंचा बोलबाला दिसतो.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दिग्गजांकडून निराशा, संतुलित संघांची चमक
दिग्गजांकडून निराशा, संतुलित संघांची चमक
आयपीएल सुरू होऊन आठ-दहा दिवस झालेत; परंतु या स्पर्धेची रंगत आतापासूनच कमालीची वाढलेली दिसून येत आहे. आतापर्यंत सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. त्यातील बहुतांश सामने हे अंतिम षटकापर्यंत रंगले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 3:13 AM