पणजी: मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेतील लढतीत सोमवारी गोव्याने दिपराज गावकरच्या नाबाद ५१ धावा आणि आयपीएल स्टार सुयश प्रभूदेसाईच्या ४१ धावांच्या बळावर बलाढ्य रेल्वे संघाला २ विकेट्सनी हरविले. दिपराजने २२ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारच्या बळावर ५१ धावा केल्या, सुयश प्रभुदेसाईने ४१ चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचत ४१ धावा केल्या तर लक्षय गर्गने महत्वाचे ३ गडी मिळवीले.
या स्पर्धेच्या पाचव्या लीग सामन्यांतील हा गोव्याचा चौथा विजय सोमवारी रांचीतील जेएससीए ओव्हल मैदानावर खेळविण्यात आलेली लढत चांगलीच रंगली. रेल्वेच्या निर्धारीत २० षटकांतील ७ बाद १९९ धावांना उत्तर देताना गोव्याची एक वेळ १५ षटकात ८ बाद १४२ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर दिपराजने मोहित रेडकरला साथीला घेत नवव्या विकेटसाठी केवळ २७ चेंडूत अविभक्त ५८ धावांची भागीदारी करत गोव्याला सामना जिंकून दिला.
त्यापूर्वी शिवम दुबेच्या ३६ चेंडूतील ५०, उपेंद्र यादवच्या १६ चेंडूतील ४८ व मोहम्मद सैफच्या ४२ धावांच्या बळावर रेल्वेने ७ बाद १९९ धावा केल्या. गोव्यासाठी लक्षय गर्गने २ अर्जुन तेंडुलकरने २ तर शुभम तारी, दर्शन मिसाळ व दिपराज गावकरने प्रत्येकी एक गडी बाद केला. गोव्याचा स्पर्धेतील सहावा लीग सामना पंजाबविरुद्ध २५ ऑक्टोबर रोजी होईल.