माऊंट मोनगानुई : गेल्या दोन सामन्यांत पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विजय नोंदविणारा भारतीय संघ पाचव्या व अखेरच्या टी-२० सामन्यात आज, रविवारी यजमान न्यूझीलंडला ५-० ने क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडने तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्याच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत कधीच सर्व सामने गमावलेले नाही.
२००५ मध्ये त्यांना मायदेशात द्विपक्षीय टी-२० मालिकेत केवळ एकदा सर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. फेब्रुवारी २००८ मध्ये इंग्लंडने त्यांना २-० ने पराभूत केले होते. या मालिकेत ५-० ने विजय मिळविला, तर भारतीय संघ टी-२० मानांकनामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर पाचव्या स्थानावर येईल. भारतीय कर्णधार विराट कोहली यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघात प्रयोग करण्याची शक्यता आहे. चौथ्या टी-२० सामन्यात तेच केले, पण संजू सॅम्सन व शिवम दुबे यांना संधी देण्याचा प्रयोग फसला.
सॅम्सनला श्रीलंका व न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यात मोजक्या वेळी फलंदाजी क्रमामध्ये बढती देण्यात आली होती; पण तो आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. दुबेकडे वेगवान गोलंदाज व फिरकीपटू यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी आवश्यक फूटवर्क नाही. मनीष पांडे सहाव्या क्रमांकावर आपले स्थान पक्के करीत आहे, तर श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. प्रश्न केवळ यष्टिरक्षक फलंदाजाचा आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेनंतर के. एल. राहुल दुहेरी जबाबदारी सांभाळत आहे. कर्णधार विराट कोहलीने संकेत दिले आहेत की, राहुल तीन सामन्याच्या वन-डे मालिकेतही यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळेल. राहुल शानदार फॉर्मात आहे, पण त्याला विश्रांती देत रिषभ पंतला संधी मिळू शकते. टी-२० मध्ये २०१९-२० च्या मोसमातील ही शेवटची लढत आहे. त्यानंतर केवळ आयपीएल खेळायचे आहे. कारण श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला बराच कालावधी शिल्लक आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डेमध्ये दुखापतग्रस्त झाल्यापासून पंत बेंचवर आहे. तो पूर्णपणे फिट आहे; पण अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवू शकलेला नाही. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येऊ शकते, तर मोहम्मद शमी पुनरागमन करू शकतो. दुसऱ्या बाजूचा विचार करता दुखापतीतून सावरलेला केन विलियम्सन या लढतीत न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
न्यूझीलंड संघ दोन्ही सामन्यांत विजयासमीप पोहोचल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला. त्यांच्या फलंदाजांना फिनिशरची भूमिका वटवावी लागणार आहे. त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत वर्चस्व गाजविण्याचे कसब आत्मसात करावे लागेल.
प्रतिस्पर्धी संघ : भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅम्सन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वाशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलिन, कोलिन मुन्रो, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सँटनर, टीम सीफर्ट, हामिश बेनेट, ईश सोढी, टीम साऊदी आणि ब्लेयर टिकनर.