चेन्नई : श्रीलंकेचा सफाया केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ रविवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत आपली लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.गेल्या काही वर्षांत भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान क्रिकेट मैदानावर चुरस दिसून आली. कसोटी मालिकेत उभय संघांतील खेळाडूंचा उत्साह अनुभवायला मिळाला. त्यात भारताने २-१ ने सरशी साधली होती.आॅस्ट्रेलियाचा ५-० ने पराभव केला, तर भारताला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावता येईल, तर ४-१ ने विजय मिळवलातर आॅस्ट्रेलिया संघ अव्वलस्थान पटकावेल.आॅस्ट्रेलिया संघ दोन अव्वल वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क व जोश हेजलवूड यांच्याशिवाय येथे आला असला तरी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या उपस्थितीत पाहुणा संघ आक्रमक आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडूंसाठी भारत हे दुसरे घर असल्याप्रमाणेच आहे. उभय संघांनी सामन्यापूर्वी कसून सराव केला असून आता नजर अंतिम अकरा खेळाडूंवर राहील.डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला फुटबॉल खेळताना दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडूंना फिरकीपटू कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्यापासून सावध राहावे लागेल. त्यामुळे त्यांनी फिरकी गोलंदाजीवर खेळण्याचा सराव करण्यासाठी स्थानिक खेळाडू मुरुगन आश्विनला पाचारण केले होते.उभय संघ येथे तीन दशकांनंतर वन-डे सामना खेळत आहेत. येथे १९८७ मध्ये रिलायन्स विश्वकप स्पर्धेत उभय संघांदरम्यान अखेरचा वन-डे सामना खेळला गेला होता. त्यात आॅस्ट्रेलियाने एका धावेने विजय मिळवला होता. आॅस्ट्रेलियाने भारतात अखेरची द्विपक्षीय मालिका २०१३ मध्ये खेळली होती. सात सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने खराब वातावरणामुळे रद्द झाले होते. चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. स्मिथकडून येथे मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत खेळपट्टी चेन्नईच्या पारंपरिक खेळपट्टीप्रमाणे असल्याचे सांगताना येथे मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. आॅस्ट्रेलियाविरुद्ध रोहितची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याने २०१३ मध्ये वन-डेमध्ये पहिले द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्ध संपलेल्या मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधार कोहलीसह रोहितच्या समावेशामुळे भारताची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. शिखरच्या अनुपस्थितीत रोहित अजिंक्य रहाणेच्या साथीने डावाची सुरुवात करेल. (वृत्तसंस्था)भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पांड्या, एम. एस. धोनी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादवआॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वार्नर,हिल्टन कार्टराईट, ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, जेम्स फॉल्कनर, नॅथन कूल्टर नाईल,पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, एश्टोन एगर, एडम झम्पा, पीटर हँडस्काब, अॅरॉन फिंच.केदार जाधव व मनीष पांडे यांनी आतापर्यंत मिळालेल्या संधीचा सदुपयोग केला आहे. मोहम्मद शमी व उमेश यादव यांच्या पुनरागमनामुळे गोलंदाजीची बाजू मजबूत भासत आहे, पण अनुभवहीन फिरकी आक्रमणावर नजर राहणार आहे. आर. आश्विन इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे, तर रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आलेली आहे.अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांनी श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे, पण आॅस्ट्रेलिया संघ वेगळा आहे.स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ २०१३ मध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास उत्सुक आहे. त्यांच्या गोलंदाजांना कोहली अँड कंपनीवर नियंत्रण राखण्याचा मार्ग शोधावा लागेल. आॅस्ट्रेलिया संघाला पहिल्या तीन लढतींमध्ये अॅरॉन फिंचची उणीव भासेल. तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.श्रीलंकेविरुद्धच्या चमकदार कामगिरीनंतरही भारतीय तंबूत मधल्या फळीचे अपयश चिंतेचा विषय आहे. के. एल. राहुल चौथ्या क्रमांकावर संघर्ष करीत आहे, पण कर्णधार कोहली व रवी शास्त्री यांनी राहुल याच क्रमांकावर खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज पहिली वन-डे, विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य
आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज पहिली वन-डे, विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य
श्रीलंकेचा सफाया केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ रविवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत आपली लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:27 AM