चेन्नई : वेस्ट इंडिजचा संघ आपली एकदिवसीय सामन्यातील कामगिरी सुधारण्यावर सध्या लक्ष देत आहे. भारताचा दौरा हा यातील एक भाग असल्याचे मत संघाचा कर्णधार किरॉन पोलार्ड याने व्यक्त केले. या मोहिमेतून लगेचच काही हाती लागेल असे नाही, असेही त्याने सांगितले.वेस्ट इंडिजचा संघ आज, रविवारपासून भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धची कामगिरी पुढे कायम ठेवण्यास पोलार्ड उत्सुक आहे. वेस्ट इंडिजने ही मालिका ३-० अशी जिंकली होती.पोलार्ड म्हणाला, ‘आम्ही एका विशेष मोहिमेवर आहोत. ५० षटकांच्या सामन्यात कसे खेळायचे याची आमची रणनीती स्पष्ट आहे. ही एक प्रक्रिया आहे, याचे फायदे लगेचच दिसणार नाहीत. अफगाणिस्तानविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी केली. आता भारताविरुद्धही चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहोत.
सामन्याच्या मध्यभागी गोलंदाजी करण्यासंदर्भात काही विशेष रणनीती बनवली आहे का, असे विचारले असता तो म्हणाला की, यावर चर्चा झाली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. तो म्हणाला, ‘सामन्यातील मधली षटके कशी टाकावीत यासंदर्भात चर्चा झाली आहे. या प्रकारात फलंदाजी किंवा गोलंदाजी या दोन्ही बाबतीत काय रणनीती आहे हे आताच स्पष्ट करणार नाही.’ संघात रोस्टन चेस याच्या समावेशामुळे संघ संतुलित झाल्याचेही त्याने सांगितले.
ड्वेन ब्राव्हो याने आंतरराष्टÑीय सामन्यात पुन्हा खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयावर तो म्हणाला, ‘कर्णधार म्हणून मला याचा आनंदच झाला. ब्राव्होसारखा खेळाडू संघात असणे फायद्याचेच आहे.’चेस हा एक चांगला खेळाडू आहे. कसोटीत तो मधल्या फळीत खेळतो. त्याने शतकही झळकावले आहे. त्याचबरोबर तो गोलंदाजीही करू शकतो. त्याच्या समावेशामुळे संघात आणखी एका एकदिवसीय सामन्यातील विशेष खेळाडूला खेळविता येऊ शकते.