प्रसाद म्हांबरे म्हापसा (गोवा) : चौथ्यांदा जगज्जेता बनलेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सपोर्ट स्टाफपैकी एक असलेल्या गोव्याचा पारस म्हांबरे हा गोलंदाज प्रशिक्षकही चमकला आहे. संघ आणि मुख्य प्रशिक्षक व मेंटर राहुल द्रविड यांच्यासोबत त्याची कामगिरीही लक्षवेधी ठरली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने स्वत: पारसचे कौतुक केले.उत्तर गोव्यातल्या हळदोणा मतदारसंघातील खोजुर्वे या छोट्याशा बेटावर मूळ घर असलेल्या पारस म्हांबरे याच्या गावात त्यामुळे आनंद झाला नसता तरच नवल. आजही त्या घरात त्यांचे इतर बंधू वास्तव्य करून आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पारसचे वडील लक्ष्मीकांत ऊर्फ कांता रघुवीर म्हांबरे हे शिक्षणानिमित्त १९५५ साली मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत त्यांनी बीएस्सी पदवी पूर्ण केली. त्यानंतर गुजरात, कोलकाता, दिल्ली अशी त्यांची सततची भ्रमंती सुरू होती. १९८० नंतर ते मुंबईतल्या वरळी भागात कायमचे स्थायिक झाले.वरळी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या व्हिनस मैदानावरून पारसच्या क्रिकेट वाटचालीला सुरुवात झाली. त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला तेथील मैदानावर गोलंदाजी करताना पाहून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आम्रेसारखे जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू घडविणारे रमाकांत आचरेकर सरांजवळ मार्गदर्शनासाठी नेले. तेथूनच ‘पारस’ला खºया अर्थाने पैलू पडले. त्यानंतर पारसची स्वप्नवत वाटचाल सुरू झाली. मुंबई रणजी संघ, भारतीय क्रिकेट संघ ते मुंबई इंडियन्स, विदर्भ, प. बंगाल संघाचे प्रशिक्षकपद तसेच विद्यमान भारतीय १९ वर्षांखालील युवा संघाचे प्रशिक्षकपद ही त्यांची स्वप्नवत वाटचाल सुरू आहे.खोजुर्वे गावात एकत्रित कुटुंब असलेले वाड्याला शोभेल असे त्यांचे पारंपरिक असे घर आहे. आपल्या क्रिकेटमधील यशस्वी वाटचालीपूर्वी पारस नित्यनेमाने आपल्या मूळ घरी येत असे. त्यानंतर वर्षार्तून किमान चारवेळा सणानिमित्त तरी तो यायचा. घरी यायला वेळ मिळाला नाही तर आपली कुलदेवता डिचोली तालुक्यात असलेल्या मुळगाव या गावातील श्री वनदेवतेच्या दर्शनाला नित्यनेमाने येतो. त्याचे येणे देवळातील उत्सवानिमित्त असो किंवा तिच्या दर्शनानिमित्त असो या ठिकाणी आजही पारस न चुकता आवर्जून येत असतो.आज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो गोव्यात येऊन जातो. आजही पारसचा मोठा चाहता वर्ग व मित्रमंडळी गोव्यात असून त्याच्याकडून बºयाच अपेक्षा गोव्यातील क्रिकेट प्रेमी बाळगून आहेत.>म्हांबरे घराण्याचे नाव केले उज्ज्वल...भारतीय संघात त्याची निवड झाल्यानंतर घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तो खास गोव्यात आलेला. ज्या वेळी त्याची भारतीय संघात निवड झाली, त्या वेळी भारतीय संघाचा न्यूझीलंड संघाबरोबरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना मडगाव येथील जवाहरलाल नेहरू मैदानावर झाला होता. पण तेव्हा अंतिम अकरात समावेश न होऊ शकल्याने गोवेकरांची निराशा झाली होती. त्यानंतर गोवेकरांना त्याचा खेळ प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळू शकली नाही.पारसने केलेल्या कामगिरीचा कोणालाही गर्व वाटावा अशी त्याची कामगिरी असून म्हांबरे घराण्याचे नाव त्याने क्रिकेटच्या इतिहासात उज्ज्वल केल्याची भावना वडील कांता म्हांबरे यांनी व्यक्त केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विश्वचषकात चमकला गोव्याचा ‘पारस’ही
विश्वचषकात चमकला गोव्याचा ‘पारस’ही
चौथ्यांदा जगज्जेता बनलेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सपोर्ट स्टाफपैकी एक असलेल्या गोव्याचा पारस म्हांबरे हा गोलंदाज प्रशिक्षकही चमकला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:15 AM