मुंबई - सध्या क्रिकेटच्या आणि राजकीय मैदानावर वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. देशात लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली असून इकडे आयपीएलच्या १८ व्या हंगामालाही सुरुवात झाली आहे. मुंबईत इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सजेच चाहते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. तर, इतरही संघाचे कर्णधार चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्यासाठी कसोशीने लढणार आहेत. मात्र, यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सवर सर्वांचेच विशेष लक्ष आहे. कारण, यंदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दीक पंड्याकडे देण्यात आली आहे. मात्र, आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यातच, आता हार्दीकने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन दुग्धाभिषेक करुन दर्शन घेतले.
मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली. रोहित शर्माकडून नेतृत्व हार्दिककडे दिल्याने आधीच नाराज असलेल्या चाहत्यांच्या रागात त्यामुळे भर पडली आहे. प्रेक्षक हार्दिकला स्टेडियमवर टीका करताना दिसत आहेत आणि त्यामुळे त्याचे मनोबल प्रत्यक्ष सामन्यात उतरण्यापूर्वीच खचत आहे. त्यातच, रोहित शर्माला हार्दीकने दिलेली वागणूक चाहत्यांना खटकल्याने सोशल मीडियातून हार्दीकला ट्रोलही करण्यात आलं आहे. त्यामुळे, मुंबई इंडियन्स, हार्दीक पांड्या आणि रोहित शर्मा हेच यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात चर्चेत आहेत.
चाहत्यांकडून होत असलेली टीका, सामन्यात पदर पडत असलेला पराभव आणि खचत असलेलं मनोबल या सर्वांपासून दूर जात हार्दीकने मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली. हार्दीकने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दुग्धाभिषेक केला. पंडितजींनी मंत्रोच्चार करुन विधीवत पूजाही केली. यावेळी, हार्दीकने सोमनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यामुळे, हार्दीकचे मनोबल वाढून गमावेला फॉर्म परत मिळेल, अशी आशा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आहे. सोमनाथ मंदिर ट्रस्टकडून हार्दीक पांड्याचा पूजा-अर्चना करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, हार्दीकने कुर्ता-पायजमान परिधान केल्याचे दिसून येते.
हार्दीकऐवजी रोहित रोहितच्या घोषणा
दरम्यान, मुंबईने आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामना खेळला. या सामन्यात यजमानांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. पण, नाणेफेकीवेळी घडलेली घटना खेळभावनेला दुखावणारी ठरली. खरं तर झाले असे की, मुंबईचा कर्णधार हार्दिक नाणेफेकीसाठी आला असता प्रेंझेंटेटर संजय मांजरेकर यांनी हार्दिकला चीअर करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केले. पण प्रेक्षकांनी दुर्लक्ष करत 'रोहित रोहित' अशा घोषणा दिल्या.