Sachin Tendulkar on Marathi Classical Language Status: शारदीय नवरात्रौत्सवातील पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापनेला केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. पण या सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने प्रतिक्रिया व्यक्त केली.
सचिन तेंडुलकर हा मूळचा मराठी माणूस असल्याने त्यालाही या निर्णयाचा आनंद झाला. सचिनने लिहिले की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्याच्यासारख्या तमाम मराठी मनांना अभिमान वाटतो आहे. त्याचसोबत सचिनने असेही नमूद केले की हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाला दिलेली ओळख आहे. मराठी बरोबरच असमिया, बंगाली, पाली, आणि प्राकृत या भाषांनाही हा सन्मान मिळाल्याबद्दल सचिनने त्या सर्वांचेही अभिनंदन केले. तसेच जास्तीत जास्त लोकांना या सुंदर भाषांचे सौंदर्य अनुभवता येईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
दरम्यान, अश्विनी वैष्णव हा निर्णय जाहीर करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच भारतीय भाषांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याकडे आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. आता आज मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच दिवशी प्रतिक्रिया दिली होती. "माझा मराठाची बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.