ठळक मुद्देआपल्या या शंभराव्या शतकासाठी सचिनला जवळपास वर्षभर वाट पाहावी लागली होती.
मुंबई : क्रिकेट जगताला ज्या गोष्टीची प्रतिक्षा होती ते भारताचा माजी महान क्रिकेटपटू, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे महाशतक आजच्याच दिवशी झाले होते, साल होते 2012. क्रिकेट जगतामध्ये शंभरावे शतक झळकावणारा सचिन हा पहिला फलंदाज ठरला होता. पण आपल्या या शंभराव्या शतकासाठी सचिनला जवळपास वर्षभर वाट पाहावी लागली होती. क्रिकेट विश्वात हा दिवस सोनेरी शब्दांनी लिहीला गेला होता.
विश्वचषक 2011. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 12 मार्चला खेळवला गेला. या सामन्यात सचिनने शतक झळकावले होते. हे सचिनच्या कारकिर्दीतील 99वे शतक होते. सचिन त्यावेळी चांगल्या फॉर्मात होता. त्याचबरोबर विश्वचषक जिंकल्यावर सचिनने निवृत्तीही पत्करली नव्हती. त्यामुळे सचिनचे शंभरावे शतक लवकरच पूर्ण होईल, असे वाटत होते. पण शंभरावे शतक पूर्ण करायला सचिनसह त्याच्या चाहत्यांना तब्बल एक वर्ष वाट पाहावी लागली.
विश्वचषकानंतर सचिन ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर सचिन आपले शंभरावे शतक झळकावेल, असे साऱ्यांनाच वाटत होते. या दौऱ्यापूर्वी सचिनने आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, " लोकांना माझ्या शंभराव्या शतकाची उत्सुकता आहे. पण माझे लक्ष्य शंभरावे शतक करणे हे नक्कीच नाही. कारण सध्या मी माझ्या खेळाचा आनंद लुटत आहे. खेळाचा आनंद लुटला की धावा आणि शतके व्हायला जास्त वेळ लागत नाही." पण या दौऱ्यात मात्र सचिनला शतक काही झळकावता आले नाही.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर सचिन आशिया चषक खेळायला बांगलादेशमध्ये गेला. या स्पर्धेत सचिनने 16 मार्च 2012 या दिवशी सचिनने बांगलादेशविरुद्ध खेळताना शंभराव्या शतकाला गवसणी घातली होती. तब्बल वर्षभरानंतर आलेल्या या शतकाचा आनंद सचिनसाठी काही औरच होता. या सामन्यात सचिनने 114 धावांची खेळी साकारली होती, पण हा सामना बांगलादेशने जिंकला होता.
शंभराव्या शतकाच्यावेळी सचिनवर झाली होती टीका
बांगलादेशविरुद्ध जेव्हा सचिनने शंभरावे शतक झळकावे तेव्हा त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती. सचिनने या खेळीत आपल्या 80 धावा 102 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या होत्या. पण त्यानंतरच्या 20 धावा करण्यासाठी सचिनला तब्बल 36 चेंडू खेळावे लागले होते. सचिनने शतक पूर्ण करण्यासाठी यावेळी जास्त चेंडू वापरले आणि त्यामुळेच भारताचा पराभव झाला, अशी टीका त्यावेळी सचिनवर झाली होती.
Web Title: Golden Day: Today was the day of the master-blaster Sachin Tendulkar's 100th century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.