अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाने शेष भारत संघाचा पराभव करुन इराणी चषक उंचावला. २७ वर्षांनंतर इराणी चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या रणजी संघाला मुंबई क्रिकेट असोसिएशन एक कोटी रुपये देणार आहे. लखनौ येथे शनिवारी झालेल्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील रणजी चॅम्पियन मुंबई संघाने ट्रॉफी जिंकली. या आधी मुंबईच्या संघाने शेवटच्या वेळी ही ट्रॉफी १९९७ मध्ये जिंकली होती. बीसीसीआयच्या ५० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप यांनी सोमवारी सत्कार समारंभात १ कोटी रुपयांच्या अतिरिक्त बक्षीस रकमेची घोषणा केली.
भारतीय संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या संघाने रणजी करंडक स्पर्धा जिंकली. यंदा त्याच्याच नेतृत्वात मुंबईने इराणी चषकाचा किताब उंचावला. मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रहाणेकडे पाहिले जाते. नेहमीप्रमाणे रणजी करंडक स्पर्धेतील विजेता संघ विरुद्ध शेष भारत अशी लढत झाली. हा सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातील चांगल्या आघाडीमुळे मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२०-२१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली होती.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मुंबईचा संघ अजिंक्य राहिला. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने इराणी चषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. इराणी चषकात मुंबई आणि शेष भारत यांच्यात चुरशीची लढत झाली. पण, सामना अनिर्णित ठरल्याने विजेतेपद मुंबईच्या हाती गेले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचा फायदा झाला. अखेरच्या दिवशी मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि मोहित अवस्थी यांनी अर्धशतके झळकावली. त्याचवेळी तनुष कोटियनने शानदार शतक झळकावून सामना अनिर्णित केला. पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. मुंबईने १५वेळा इराणी चषक उंचावण्याची किमया साधली. रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ रणजी करंडक स्पर्धेतही चॅम्पियन ठरला.