Join us  

Ajinkya Rahane : IND vs SL कसोटीत हनुमा विहारीने नांगर रोवला अन् रणजी करंडकात अजिंक्य रहाणे भोपळ्यावर गेला

भारतीय संघ मागील ११ वर्षांत एकाही कसोटीत अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा यांच्याशिवाय खेळलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 6:16 PM

Open in App

भारतीय संघ मागील ११ वर्षांत एकाही कसोटीत अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा यांच्याशिवाय खेळलेला नाही. पण, आज ती वेळ आली. ११ वर्षांत प्रथमच टीम इंडियाच्या अंतिम ११ मध्ये ना अजिंक्य आहे, ना पुजारा... हे दोघेही रणजी करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करून टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण, नशिबाची त्यांना काही साथ मिळत नाही. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणे आज ओदिशाविरुद्ध पहिल्या चेंडूंत ( Golden duck for Ajinkya Rahane ) माघारी परतला. मात्र, भारत-श्रीलंका कसोटीत संधी मिळालेल्या हनुमा विहारीने ५८ धावांची महत्त्वाची खेळी करून भारतासाठी भक्कम पाया उभा केला.

ओदिशाच्या पहिल्या डावातील २८४ धावांचा पाठलाग करताना मुंबईने दिवशअखेर ३ बाद २५९ धावा केल्या. कर्णधार पृथ्वी शॉ आणि एस एम यादव यांनी पहिल्या विकेटसाठी चांगला खेळ केला. यादव १९ धावांवर माघारी परतल्यानंतर शॉ व अरमान जाफर यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. शॉ ६४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला अजिंक्य पहिल्याच चेंडूवर राजेश मोहंतीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर सर्फराज खान व जाफर यांनी मुंबईचा डाव सावरला. सर्फराजने पुन्हा एकदा शतकी खेळी केली. मागील १२ डावांतील त्याचे हे पाचवे शतक ठरले. यात एका त्रिशतकाचा व एक द्विशतकाचा समावेश आहे.

सर्फराज ११७ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह १०७ धावांवर नाबाद आहे, तर जाफरही ७७ धावांवर खेळतोय. मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद २५९ धावा केल्या असून अजूनही ते २५ धावांनी पिछाडीवर आहेत. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेरणजी करंडकमुंबई
Open in App