अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ म्हणजे १९७१ हे वर्ष. भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर हरवण्याची आश्चर्यकारक किमया साधली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील लॉर्ड्सची पहिली आणि ओल्ड ट्रॅफर्डची दुसरी कसोटी भारताने अनिर्णीत राखली, मग केनिंग्टन ओव्हलच्या तिसऱ्या कसोटीत पहिला विजय मिळवला. हा भारताचा इंग्लंडमध्ये पहिला मालिका विजय देखील आहे. २४ ऑगस्ट, १९७१ या दिवशी भारताने तो ऐतिहासिक विजय साकारला होता, मंगळवारी त्या घटनेला ५० वर्षे होत आहेत. नुकत्याच लॉर्डसवरील विजयाने या आठवणींना उजाळा मिळाला आहे. भारताचे काही विजय...
द ओव्हल, १९७१
इंग्लंडमधील उन्हाळ्याचे ते अखेरचे दिवस होते. ओव्हलवर पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने ३५५ धावा केल्या होत्या. दुसरा दिवस पावसाने धुवून काढला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताने ७ बाद २३४ धावा केल्या आणि चौथ्या दिवशी सकाळी भारताचा डाव २८४ धावांवर संपला. इंग्लंडने दुसऱ्या डावाला उपाहाराच्या काही वेळ आधी सुरूवात केली. पण ओव्हलवर भागवत चंद्रशेखर यांच्या रुपाने वादळच आले. त्यांनी आपल्या फिरकीच्या जोरावर १८.१ षटकांत फक्त ३८ धावा देत सहा बळी घेतले. त्यावरही त्यांनी जॉन जेमीसन यांना धावबाद केले, तर बिशनसिंग बेदी यांनी एक बळी घेतला आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांनी २ बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडला फक्त १०१ धावा करता आल्या. त्यानंतर भारताने ६ बाद १७६ धावा करत विजय मिळवला. त्यात अजित वाडेकर यांनी दुसऱ्या डावात ४५ आणि दिलीप सरदेसाई यांनी ४० धावा करत इंग्लंडला चीत केले.
द ओव्हल १९७९
अखेरच्या दिवशी चहापानाच्या वेळी भारतीय संघ ३०४ धावांवर एक बाद अशा परिस्थितीत होता आणि विजयासाठी फक्त १३४ धावा करायच्या होत्या. त्यावेळी पुरेशी षटकेदेखील होती. भारताचे कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन यांना ते सर्व क्षण आठवतात. जेव्हा चौथा डाव सुरू झाला. तेव्हा संघ विजयाबाबत विचार करत नव्हता. पण पहिला बळी २०० धावांवर गेला. तेव्हा संधी असल्याचे जाणवले आणि मग अशक्य ते शक्य असा प्रवास सुरू झाला. सुनील गावसकर यांनी दुहेरी शतक लगावले. त्यांनी एकही चूक केली नाही. त्यावेळी भारतीय संघ इतिहास रचणार होता. वेंकट यांनी कपिल देव यांना आधी फलंदाजीला पाठवले. मात्र, ते बाद झाले. त्यानंतर भारत ४२३ धावांवर ८ अशा स्थितीत पोहोचला. नऊ धावांची आवश्यकता असताना खेळ थांबवण्यात आला आणि हा सामना अनिर्णित अवस्थेत सुटला.
लॉर्ड्स, लंडन, १९८६
कपिल आणि लॉर्ड्स, वेंगसरकर आणि लॉर्ड्स यांचे नाते नेहमीच विशेष राहिले आहे. १९८६च्या कसोटी सामन्यातदेखील या मैदानावर यजमान इंग्लंडविरोधात त्यांनी विजय मिळवून दिला. दिलीप वेंगसरकर यांनी नाबाद १२६ धावा केल्या होत्या. संघाला ३४१च्या धावसंख्येवर पोहोचवले. दुसऱ्या डावात कपिल यांचे चार बळी, या कामगिरीमुळे इंग्लंडला फक्त १८० धावा करता आल्या. त्यानंतर भारताने पाच गडी राखून विजय मिळवला.
हेडिंग्ले १९८६
दिलीप वेंगसरकर यांची परदेशात आणि विशेषत: इंग्लंडमध्ये कशी फलंदाजी बहरते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी या सामन्यातही पहिल्या डावात ६१ आणि दुसऱ्या डावात १०२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. पहिल्या डावात भारताने २७२ धावा आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या, तर इंग्लंडचा संघ फक्त १०२ आणि दुसऱ्या डावात १२८ धावाच करू शकला. आणि भारताला २७९ धावांनी विजय मिळवून दिला होता. बिन्नी यांनीही सामन्यात ७ बळी घेतले होते.
हेडिंग्ले २००२
या सामन्यात संघ प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करून मैदानात उतरला. त्यावेळी संघ दोन फिरकीपटूंसह खेळत होता. सलामीवीर संजय बांगरचे अर्धशतक, राहुल द्रविड याच्या १४८ धावा, सचिन तेंडुलकर याच्या १९३ आणि कर्णधार सौरव गांगुलीच्या १२८ धावा यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी ८ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी कमाल दाखवली आणि इंग्लंडच्या संघाला २७३ धावातच गुंडाळले. फॉलोऑन मिळाल्यावरदेखील इंग्लंडचा संघ ३०९ धावाच करू शकला. दुसऱ्या डावातदेखील अनिल कुंबळे याने चार बळी घेतले. त्यामुळे भारतीय संघाला आपण परदेशातदेखील विजय मिळवू शकतो, असा विश्वास मिळाला.
ट्रेंट ब्रिज २००७
हा तोच सामना ज्यात राहुल द्रविडसोबत जेली बिन्सचा किस्सा घडला होता आणि हा तोच सामना ज्यात जहीर खान याने आपल्या स्वॅगने इंग्लंडच्या फलंदाजांना दाखवून दिले होते, की इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर भारतीय जलदगती गोलंदाजांनादेखील स्विंग करता येते आणि यशदेखील मिळवता येते. पहिल्या डावात इंग्लंडचे चार फलंदाज गारद करत जहीरने आपला स्वॅग दाखवला होता, तर इंग्लंडचा डाव १९८ धावात गुंडाळला गेला. मग भारतीय फलंदाजांना शतकी खेळी करता आली नसली तरी सामूहिक प्रयत्न काय असतात, हे त्यांनी दाखवून दिले. दिनेश कार्तिक, वसीम जाफर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीहीएस लक्ष्मण यांनी अर्धशतके करून भारताला ४८१ धावा करून दिल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात ३५५ धावा केल्या खऱ्या, पण त्यामुळे भारताला फक्त ७३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. तीन बळींच्या मोदबल्यात भारताने हे लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला.
Web Title: Golden Jubilee of Victory over England! August 24 marks the 50th anniversary of the 1971 victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.