भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवात साजेशी झाली नाही. ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. वर्षातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहली अन् टीमची फटकेबाजी पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुर होते. आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ( CAA) आंदोलन सुरु असतानाही सामना पाहण्यासाठी गुवाहाटीचे स्टेडियम तुडूंब भरले होते. पण, त्यांच्या पदरी निराशा आली. अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅलेंडर वर्षातील पहिला ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना रद्द झाल्यानं चाहते निराश झाले असतील, परंतु आता जो योगायोग तुम्हाला सांगणार आहोत, त्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नक्की फुलेल.
कॅलेंडर वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना रद्द होणे, हे टीम इंडियासाठी शुभसंकेत आहेत. त्यामागे एक योगायोग आहे. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे आणि त्याच दृष्टीनं हे शुभसंकेत आहेत. भारताच्या नावावर आतापर्यंत तीन वर्ल्ड कप आहेत. त्यात दोन वन डे ( 1983 व 2011) आणि एक ट्वेंटी-20 ( 2007) वर्ल्ड कपचा समावेश आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला आणि विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पावसानं एन्ट्री मारली आणि त्याची फलंदाजी सुरूच राहिली. काही काळ त्यानं विश्रांती घेतली खरी, परंतु तोपर्यंत खेळपट्टीचे बरेच नुकसान झाले होते. तीन वेळा खेळपट्टी पाहणी केल्यानंतर अखेर 9.46 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित 50 हजाराहून अधिक क्रिकेटचाहते निराश चेहऱ्यानं माघारी परतले. पण, सामना रद्द होणे, ही आनंदाची गोष्ट आहे. कसं?
जरा फ्लॅश बॅक मध्ये जावूया...
टीम इंडियानं 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप उंचावला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अंतिम सामन्यात नाट्यमयरित्या पाकिस्तानचा पराभव केला. 2007 मध्ये प्रथमच ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता आणि तो जिंकण्याचा मान टीम इंडियानं पटकावला. 2007च्या कॅलेंडर वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना रद्द झाला होता आणि त्याचवर्षी टीम इंडियानं काय केलं, हे सर्वांना माहित आहेच. स्कॉटलंडविरुद्धचा तो सामना वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी सामना होता आणि तो रद्द झाला होता.
2020 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या कॅलेंडर वर्षातील पहिला सामना रद्द झाल्यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Web Title: Good luck! Team India's chances of winning the Twenty20 World Cup this year increased, know how
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.