India vs West Indies 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन डेआधी बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर करत सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) व मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती मंगळवारी मिळाली होती. त्यानंतर ते संघातील इतर खेळाडूंबरोबर सराव करतानाही दिसले. 'ते परत आलेत', अशा कॅप्शनने BCCI ने हा खास व्हिडीओ आज शेअर केला.
''शिखर आणि श्रेयस यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि ते सरावाला सुरुवात करू शकतात. ऋतुराज अजूनही आयसोलेशनमध्ये आहे'', अशी माहिती काल ANIने सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. भारतीय संघाचे सायंकाळी सराव सत्र होणार होते आणि त्यात हे दोघंही सहभाग घेतील असंही सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ते दोघेही सरावाला उतरल्याचं दिसून आले.
पहिल्या वन डे सामन्याआधी शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड यांच्यासह नवदीप सैनी व अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर हे सर्व खेळाडू आयसोलेशनमध्ये होते. नवदीप सैनीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याने सोमवारीच सरावाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता शिखर व श्रेयस यांनीही सरावाला हजेरी लावली. पण या दोघांना दुसऱ्या वन डे सामन्यात मात्र खेळता येणार नाहीये. त्यामुळे रोहित आणि राहुल ही जोडीच ओपनिंग करेल. तसेच मधल्या फळीत सूर्यकुमारची जागा कायम राहिल असा सर्वसाधारण अंदाज आहे.