आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी भारतीय संघाला या वर्षाच्या उत्तरार्धात दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळायचे आहे. सुरुवातीला ३१ ऑगस्टपासून भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल. या दोन महत्त्वपूर्ण स्पर्धांपूर्वी भारतीय संघासाठी खूशखबर समोर आली आहे. भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जयप्रीत बुमराह लवकरच मैदानात पुनरागमन करताना दिसणार आहे.
जसप्रीत बुमराह गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यांपासून क्रिकेटच्या मैदानाबाहेर आहे. मात्रा आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेमधून बुमराह भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. बुमराह आता दुखापतीतून बऱ्यापैकी सावरत असून, लवकरच मैदानात परतणार आहे. यावर्षी मार्च महिन्यामध्ये बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते.
बुमराहच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून असलेल्या अधिकाऱ्याच्या मते आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराहच्या पुनरागमनाचे संकेत खूप सकारात्मक आहेत. जसप्रीत बुमराह यावर्षी होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी खूप तंदुरुस्त दिसत आहे. ही भारतीय संघासाठी खूप चांगली बातमी आहे. सर सारं काही व्यवस्थित घडलं तर बुमराह लवकरच मैदानात उतरताना दिसेल.
नितीन पटेल आणि रजनीकांत हे एनसीएमधील फिजिओ बुमराहसोबत काम करत आहेत. एनसीएमधये रिहॅब कालावधीदरम्यान त्याच्यावर देखरेख ठेवून आहेत. दोघेही खूप अनुभवी आहेत. तसेच बुमराहबाबत कुठलीही जोखीम पत्करू इच्छित नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, हे वर्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचं वर्ष आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या हंगामाचीही सुरुवात होणार आहे.