केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 जानेवारीपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूशखबर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघातील मुख्य गोलंदाज डेल स्टेन पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. डेल स्टेनला पहिल्या कसोटीत खेळणं जोखमीचं ठरु शकतं, आणि सध्या कोणतीही जोखीम उचलू इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मंगळवारी ओटिस गिब्सन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'डेल स्टेन गेल्या एक वर्षापासून संघातून बाहेर आहे, आणी जर आम्ही तीन जलद गोलंदाज आणि एक स्पिनर खेळवले तर त्यांनी त्याच गतीने गोलंदाजी करावी अशी आमची अपेक्षा असेल. पण जर काही झालं आणि डेल स्टेन संपुर्ण सामना खेळू शकला नाही तर संघासमोर संकट उभं राहू शकेल'. नोव्हेंबर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली होती.
ओटिस गिब्सन पुढे म्हणाले की, 'डेल स्टेन संपुर्ण सामना खेळू शकणार नाही असं मला म्हणायचं नाही. पण उन्हाळ्याआधी सुरु होत असलेल्या या सामन्यात खेळवण्याची जोखीम घेऊ शकत नाही. तो चर्चेत सहभागी होईल, मात्र मैदानावर उतरणा-या संघावर सर्व काही अवलंबून असेल'. 'आम्हाला सर्वोत्कृष्ट संघ निवडायचा आहे. खेळाडूंची निवड करणं फार कठीण काम आहे. पण देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध असणं संघासाठी चांगलं आहे', असं ते बोलले आहेत.
भारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. याच दौ-यात भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे.
2017 सालात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघानं आपलं वर्चस्व कायम राखलं. कसोटी, वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत भारताने सरत्या वर्षाचा शेवटही गोड केला. गतवर्षी भारतानं 14 मालिकांसह 37 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र 2018 सालात भारतासमोर खडतरं आव्हान असणार आहेत. आगामी वर्षात भारताला बहुतांश सामने हे परदेशात खेळायचे आहेत. यापैकी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारतामध्ये जशा खेळपट्टय़ा असतात तशा निश्चितच दक्षिण आफ्रिकेत मिळणार नाहीत, तेथील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी जास्त मिळते. या दौऱ्यात गोलंदाजीबरोबरच भारतीय फलंदाजांची खरी परीक्षा असणार आहे.
2017 चा हंगाम भारतीय संघासाठी चांगला गेला असला तरीही भारताच्या यशात विशेष काहीच वाटत नाही. वर्षभरात भारत बहुतांश सामने हे घरच्या मैदानावर खेळला आणि काही अपवाद वगळले तर एकदाही भारताला प्रतिस्पर्धी संघाकडून कडवी टक्कर मिळालेली नाही. त्यामुळे एकतर्फी विजयच पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिका दौ-याची भारताची ही सातवी प्रदक्षिणा असेल. 1992 पासून भारतीय संघाला या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत.