भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक खूष खबर आहे. कारण आता त्यांची प्रतिक्षा संपणार असून धोनी लवकरच संघात पुनरागमन करणार असल्याचे वृत्त आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार, तो टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळणार की मैदानाबाहेरच निवृत्ती जाहीर करणार, आदी अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात बाऊंसरसारखे आदळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून धोनीला वगळले आहे. त्यानंतर धोनीला निवृत्तीचे संकेत देण्यात आले, असाही अर्थ लावण्यात आला.
सध्याच्या घडीला धोनी विश्रांती घेत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे धोनी सध्या विश्रांती घेत आहे. काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षीने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
धोनी यापुढे मैदानात दिसणार की नाही, ही चिंता त्याच्या चाहत्यांना सतावत होती. त्याचबरोबर धोनी कधी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार, याची क्रिकेट जगताला उत्सुकता होती. काहींनी तर धोनी आता मैदानात न उतरताच निवृत्ती घेणार असल्याच्या अफवाही पसरवल्या होत्या. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
आगामी इंडियन प्रीमिअर लीग ही धोनीच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. पण, आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास धोनी निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्रींनी दिले होते. ते म्हणाले होते की, ''मलाही तुम्हाला हेच विचारायचं आहे. आता आयपीएल येत आहे. त्यानंतर सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. निवड समिती, कर्णधार सर्वांचे आपल्याकडे लक्ष आहे, याची जाण धोनीलाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे धोनीलाच स्वतःच्या पुढच्या वाटचालीबाबत कळेल. निवृत्तीचा निर्णय हा त्याच्याच हाती आहे. तुम्ही त्याला जाणता आणि मीही..''
धोनीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर तो आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात आपल्याला दिसू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीने आता आयपीएलच्या सरावावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच तो २९ फेब्रुवारीला चेन्नईला जाणार असून १ मार्चपासून सरावाला सुरुवात करणार आहे. जवळपास एक महिना सराव करून धोनी आयपीएलमध्ये उतरणार आहे. हे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे.