कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षाने पुढे ढकलण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावरही अजून अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे चाहत्यांना जुने सामने पाहून क्रिकेटचा आनंद लुटावा लागत आहे. पण, टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज आली आहे. भारतीय संघ ऑगस्टमध्ये परदेश दौऱ्यावर जाणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वन डे सामन्यांची मालिका कोरोना व्हायरसमुळे रद्द करावी लागली होती. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येनं शंभरी गाठल्यामुळे ही संपूर्ण मालिकाच रद्द करावी लागली होती. तेव्हा दक्षिण आफ्रिका संघानं मालिका पूर्ण करण्यासाठी पुन्हा भारत दौऱ्यावर येण्याचे कबुल केले होते, परंतु आता भारतीय संघच आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
कोरोना व्हायरसची परिस्थिती सुधारल्यास भारतीय संघ ऑगस्टमध्ये आफ्रिका दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त 'मुंबई मिरर'ने प्रसिद्ध केले आहे. ऑगस्टमध्ये भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार होता. पण, आता तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया आफ्रिकेला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) तसा विचार करत आहे.
यावर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या भूमिकेकडे बीसीसीआयचे लक्ष लागले आहे. आफ्रिका मंडळ सध्या आर्थिक संकटात आहे आणि या मालिकेतून त्यांना मदत मिळेल, असा त्यामागचा हेतू असल्याची चर्चा आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) या मालिकेला परवानगी देईल का, याचीही उत्सुकता आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार
विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान