Team India साठी गुड न्यूज! वाँडरर्सच्या मैदानावर कसोटीत एकदाही नाही झालाय भारताचा पराभव

जोहान्सबर्गमधील वाँडरर्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. दरम्यान, सलग दोन पराभवांमुळे आत्मविश्वासाला धक्का बसलेल्या भारतीय संघासाठी वाँडरर्सवरची आकडेवारी आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 02:21 PM2018-01-22T14:21:37+5:302018-01-22T14:37:06+5:30

whatsapp join usJoin us
Good news for Team India! India's defeat at the Wanderers Stadium has not happened |  Team India साठी गुड न्यूज! वाँडरर्सच्या मैदानावर कसोटीत एकदाही नाही झालाय भारताचा पराभव

 Team India साठी गुड न्यूज! वाँडरर्सच्या मैदानावर कसोटीत एकदाही नाही झालाय भारताचा पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय संघातील रथी-महारथी फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने भारतीय क्रिकेट संघ आणि कर्णधार विराट कोहली सध्या टीकेचे लक्ष्य होत आहे. त्यामुळे जोहान्सबर्गमधील वाँडरर्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. दरम्यान, सलग दोन पराभवांमुळे आत्मविश्वासाला धक्का बसलेल्या भारतीय संघासाठी वाँडरर्सवरची आकडेवारी आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे. 
आतापर्यंतच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली असली तरी जोहान्सबर्गमधील वाँडरर्सचे मैदान मात्र भारतीय संघासाठी नेहमीच भाग्यवान ठरले आहे. येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आतापर्यंत चारवेळा आमनेसामने आले असून, त्यात एका सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे तर चार कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेमधील पहिला विजयसुद्धा वाँडरर्सच्या मैदानावरच 2006 साली मिळवला होता.
 
1992 साली भारतीय संघाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तेव्हा मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 292 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरदाखल भारताचा 227 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात 252 धावा करून दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 318 धावांचे आव्हान ठेवले. मात्र अखेरच्या दिवशी 4 बाद 141 धावा फटकावून भारताने हा सामना अनिर्णित राखला.
 
त्यानंतर 1997 साली भारतीय संघसचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा दोन्ही संघात वाँडरर्सवर खेळवला गेलेला सामना अटीतटीचा झाला होता. राहुल द्रविडने केलेल्या 148 धावांच्या संस्मरणीय खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 410 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल दक्षिण आफ्रिकेचा डाव 321 धावांत आटोपला होता. त्यानंतर 8 बाद 266 धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित करून दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 356 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना खेळ संपेपर्यंत 8 बाद 228 धावा फटकावून दक्षिण आफ्रिकेने आपला पराभव टाळला होता. भारताला विजय मिळवण्यासाठी दोन बळी कमी पडले. 

पुढे 2006 साली भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वाँडरर्सवर खेळवली गेलेली कसोटी ऐतिहासिक ठरली. या कसोटीत राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 123 धावांनी सनसनाटी विजय मिळवला होता. भारतीय संघाचा हा दक्षिण आफ्रिकेतील पहिला विजय ठरला होता. या सामन्यात एस. श्रीसंतची भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती. तसेच सौरव गांगुलीचे भारतीय संघामधील यशस्वी पुनरागमन हेसुद्धा चर्चेचा विषय ठरले होते. 
त्यानंतर 2013 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी आमना सामना झाला होता.  शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला तो सामना अनिर्णित राहिला होता. अटीतटीच्या झालेल्या त्या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी (119 धावा) तर दुसऱ्या डावात 96 धावांची खेळी केली होती.  त्या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेल्या 458 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने खेळ संपेपर्यंत 450 धावांपर्यंत मजल मारली होती. 
आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बुधवारपासून वाँडरर्सवर सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे  या मैदानावरील याआधीच्या कामगिरीमधून प्रेरणा घेत जबरदस्त कामगिरी करण्याचा विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांचा इरादा असेल.

Web Title: Good news for Team India! India's defeat at the Wanderers Stadium has not happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.