भारतीय संघाच फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. त्यानं गुरुवारी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. चहलनं इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यात तो आई-वडील व पत्नीसोबत दिसत आहे. चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती आणि आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.
फोटोमध्ये चहल घराच्या पायऱ्यांवर बसलेला दिसत आहे. त्याच्यासोबत पत्नी धनश्री वर्मा आहे आणि मागच्या पायरीवर आई-वडील बसले आहेत. त्यानं लिहिलं की,तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी व दाखवलेल्या पाठींब्यासाठी सर्वांचे आभार. माझ्या आई-वडिलांची प्रकृती आता चांगली आहे आणि मी तुम्हालाही सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो.
धनश्रीनं सोशल मीडियावरून सासू-सासऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. "एप्रिल आणि मे महिना माझ्यासाठी खूप आव्हानात्मक राहिला आहे. आधी माझी आई आणि भाऊ यांना कोरोनाची लागण झाली. दोघांनाही जेव्हा कोरोनाची लागण झाली होती तेव्हा मी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये होते. त्यामुळे काहीच मदत करता आली नाही. दरम्यान, मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात होते. कुटुंबापासून दूर राहणं फार कठीण काम असतं", असं धनश्रीनं म्हटलं होतं.
"आता माझ्या सासरची मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. माझे सासरे म्हणजेच यजुवेंद्र चहलचे वडील कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. तर सासू राहत्या घरीच क्वारंटाइन आहेत. मी रुग्णालयात होते आणि मी जे पाहिलंय ते खूप भयंकर आहे. मी काळजी घेतच आहे पण तुम्हीही काळजी घ्या, घरातच राहा आणि कुटुंबाची काळजी घ्या", असं धनश्रीनं म्हटलं होतं.