नवी दिल्ली ।
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या लॉर्ड्सवरील सामन्यात इंग्लिश संघाचा धुव्वा उडवून मालिकेवर कब्जा करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. दरम्यान, टी-२० आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे इंग्लंडला भविष्यासाठी फायदा होणार आहे. कारण काहीवेळा विजयापेक्षा पराभवातून अधिक शिकता येते असे इंग्लंडचा ऑलराउंडर मोईन अलीने म्हटले आहे. केनिंग्टन ओव्हल येथे मंगळवारी झालेल्या भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यात इंग्लिश संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता.
पराभवातून शिकण्यासारखे अधिक- अली मोईन अलीने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, "आम्ही काही सामन्यात पराभूत झालो जे आमच्यासाठी चांगले आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी आम्ही फॉर्मात येऊ अशी आशा आहे. याचा अर्थ आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करत नाही असे होत नाही. पराभव होणे देखील आवश्यक असते कारण त्यातून काही गोष्टी शिकता येतात"
इंग्लंडच्या संघाने नवनिर्वाचित कर्णधार जोस बटलरच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मालिका खेळली आहे. संघात काही बदलण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत आणि आम्हाला फक्त एक संघ म्हणून चांगली कामगिरी करायला हवी. तसेच आम्ही विश्वचषक स्पर्धा देखील जिंकलेली आहे. आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत त्यांच्या पुनरागमनामुळे संघाची ताकद आणखी वाढणार आहे, असेही मोईन अली पुढे म्हणाला.