मुंबई - परदेशात द्विशतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज दिलीप सरदेसाई यांना जन्मदिवशी Google ने सलाम केला आहे. त्यांच्या 78व्या जन्मदिवशी त्यांचे Google Doodle बनवण्यात आले आहे. त्यात दिलीप सरदेसाई फलंदाजी करताना दाखवण्यात आले आहेत. सरदेसाई यांचा जन्म 8 ऑगस्ट 1940 मध्ये झाला होता.
सरदेसाई यांनी 1959-60 च्या दरम्यान रोहिंटन बारिया चषक आंतरविद्यापीठ स्पर्धेतून क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली. 1960-61साली पाकिस्तानविरूद्ध भारतीय विद्यापीठ संघाकडून त्यांनी पदार्पण केले आणि त्या लढतीत त्यांनी 87 धावा केल्या होत्या. त्यांनी एकूण 30 कसोटींमध्ये दोन द्विशतकांसह पाच शतक झळकावले.
1970-71च्या वेस्ट इंडिज दौ-यावर सरदेसाई यांनी 212 धावांची खेळी केली. किंग्जस्टन येथील कसोटीत भारताचे पाच फलंदाज 75 धावांवर माघारी परतले होते आणि त्यावेळी सरदेसाई यांनी द्विशतक ठोकले. दुस-या कसोटीत सरदेसाई यांच्या 112 धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर पहिला कसोटी विजय मिळवला होता.
तत्पूर्वी 1963-64च्या इंग्लंड दौ-यात पाच सामन्यांत सरदेसाई यांनी 449 धावा केल्या होत्या आणि याच मालिकेतील अखेलच्या सामन्यात त्यांनी 79 व 87 धावा केल्या होत्या. याच कामगिरीमुळे भारताने कसोटी अनिर्णीत राखली होती. सरदेसाई यांनी 30 कसोटी सामन्यांत 39.23 च्या सरासरीने 2001 धावा केल्या आहेत.