रणजी करंडक स्पर्धेच्या 2019-2020 या हंगामाला 9 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतातील सर्वात जुनी आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय संघाला प्रतिभावान खेळाडू देणाऱ्या या स्पर्धेचे सर्वाधिक 41 जेतेपद ही मुंबईच्या नावावर आहेत. माजी विजेत्या मुंबईला या हंगामाच्या पहिल्याच लढतीत बडोदा संघाचा सामना करावा लागणार आहे. पण, या सामन्यापूर्वी मुंबईचा प्रमुख खेळाडू सिद्धेश लाड यानं माघार घेतल्याचं वृत्त आहे. सिद्धेश लवकरच बोहोल्यावर चढणार आहे आणि त्यामुळे त्यानं पहिल्या सामन्यासाठी त्याच्या नावाचा विचार करू नये, अशी विनंती केल्याचे समजतं. त्याच्या या विनंतीमुळे 1962चा एक किस्सा आठवणीत आला.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना अन् शिवाजी पार्कवर लग्न... सुधाकर अधिकारी हे सकाळी 9.03च्या सुमारास बोहोल्यावर चढले... त्यानंतर ते 10.30 वाजता ब्रेबॉर्न स्टेडियमवर रणजी सामना खेळण्यासाठी पोहोचले. सायंकाळी 5.05 वाजेपर्यंत क्रिकेट सामना खेळल्यानंतर ते थेट विवाह स्थळावर रिसेप्शनसाठी हजर झाले. पॉली उम्रीगर नाणेफेकीला जाण्यापूर्वी म्हणजेच बरोबर 10.15 मिनिटाच्या ठोक्याला सुधाकर अधिकारी मैदानावर पोहोचले होते. त्यासामन्यात त्यांनी शतकी खेळीही साकारली होती.
त्यांनी एवढी धावपळ का केली, याबाबत त्यांनी सांगितलं होतं की,''मुंबईच्या संघात आपले स्थान टिकवून ठेवणं, खुप आव्हानात्मक होते. 70 धावा करूनही फलंदाजाला पुढील सामन्यात संघातून डच्चू मिळाल्याचं मी पाहिले आहे. मुंबईच्या संघात स्थान पटकावणारे अनेक प्रतिभावान खेळाडू रांगेत होते.'' सुधाकर अधिकारी यांनी 1959 ते 1971 या कालावधीत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 65 सामन्यांत 11 शतकं व 18 अर्धशतकांसह 3779 धावा केल्या. 192 ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. शिवाय त्यांच्या नावावर 5 विकेट्सही आहेत.