Grace Harris Hits Huge Six With Broken Bat : संपूर्ण क्रिकेट विश्व वन डे विश्वचषकात रमले असताना ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. कांगारूंच्या धरतीवर महिला बिग बॅश लीगला १९ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. आज या स्पर्धेतील पाचवा सामना पर्थ स्कॉचर्स आणि ब्रिस्बेन हिट्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यातील एक षटकार चाहत्यांच्या मनात घर करून गेला. खरं तर झाले असे की, अनुभवी फलंदाज ग्रेस हॅरिसने ब्रिस्बेन हिटकडून खेळताना शानदार शतक झळकावले. तिने ५९ चेंडूत नाबाद १३६ धावांची अप्रतिम खेळी केली.
आपल्या खेळीदरम्यान हॅरिसने १२ चौकार आणि ११ षटकार मारले. म्हणजेच तिने केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या. हॅरिसने २३०.५१ च्या स्ट्राईक रेटने स्फोटक खेळी केली. पॉवर हीटिंगसाठी ओळखली जाणारी हॅरिस लेडी ख्रिस गेल म्हणून प्रसिद्ध आहे.
ग्रेस हॅरिसची 'पॉवर'या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. ग्रेस हॅरिस फलंदाजी करत असताना तिने तुटलेल्या बॅटने षटकार ठोकला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चौदाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तिने हा अनोखा षटकार मारला. स्कॉर्चर्ससाठी पिप्पा क्लीरी हे षटक टाकत होती, षटकार पाहून ती देखील अवाक् झाली.
हॅरिसच्या १३६ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन हीटने निर्धारित २० षटकांत स्कॉर्चर्ससमोर २३० धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरिसशिवाय मिग्नॉन डू प्रीझने आपल्या संघासाठी २३ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावांची महत्त्वाची खेळी केली. पण, या दोन फलंदाजांशिवाय इतर कोणताही खेळाडू मैदानावर हॅरिसला जास्त वेळ साथ देऊ शकला नाही.