२०११ नंतर भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप जिंकेल असे स्वप्न साऱ्यांनाच पडले होते... रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग १० सामने निर्विवादपणे जिंकून फायनलपर्यंत पोहोचला होता.. एक विजय अन् वर्ल्ड कप टीम इंडियाच्या हातात.. पण, ऑस्ट्रेलियासारखा कट्टर प्रतिस्पर्धी समोर असताना हे सहज शक्य होईल, ही भीती मनाच्या एका कोपऱ्यात घर करून होती आणि तिच खरी ठरली. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम खेळ करून वर्ल्ड कप उंचावला आणि भारतीयांचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळवले. २००३च्या पराभवाच्या वचपा काढण्याची १४० कोटी भारतीय वाट पाहत होते, परंतु हाती निराशा आली. पराभवाने खचलेल्या भारतीय खेळाडूंना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले अन् खेळाडूंना धीर दिला. पंतप्रधान मोदींच्या या कृतीवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानेही मत मांडले आहे.
विराट कोहली २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार; ज्योतिषाची भविष्यवाणी, २०१६ साली जे म्हणाले ते ठरतंय खरं
रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीनंतर भारतीय संघाचा डाव गडगडला. शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) यांनी निराश केले आणि विराट कोहली ( ५४) व लोकेश राहुल ( ६६) यांनी १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. भारताचा संपूर्ण संघ २४० धावांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाचेही ३ फलंदाज ४७ धावांत माघारी परतले होते, परंतु ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन उभे राहिले. हेडने १२० चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १३७ धावा केल्या. लाबुशेनसोबत त्याची २१४ चेंडूंवरील १९२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. लाबुशेन ११० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ बाद २४१ धावा केल्या आणि ६ विकेट्स व ४२ चेंडू राखून जेतेपद पटकावले.
भारतीय संघाने वर्ल्ड कप गमावल्यानंतर शोएब अख्तरने भारत व ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुक केले. विकेटवरून त्याने नाराजी व्यक्त केली. त्यात आज त्याने नरेंद्र मोदी यांच्या ड्रेसिंग रुममधील कृतीचे कौतुक केले. तो म्हणाला, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हेच त्यांच्या पंतप्रधानांनी कृतीतून दाखवून दिले. ही खूप मोठी गोष्ट आहे. संपूर्ण देश भारतीय संघाच्या पाठीशी उभा असल्याचे सिद्ध झाले. हा खूप भावनिक क्षण आहे. त्यांनी एखाद्या लहान मुलांसारखी खेळाडूंची काळजी घेतली आणि त्यांचे मनोबल उंचावले. तुम्ही चांगले खेळलात, हेच ते खेळाडूंना सांगत होते. Great Gesture!