Mumbai Indians hoardings - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील साखळी फेरीचे ७० सामने मुंबई-पुणे येथे खेळवण्यात येणार आहे. मुंबईच्या वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर या लढती खेळवण्यात येणार आहेत. वानखेडे व डी वाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २०, तर ब्रेबॉर्न व गहुंजे स्टेडियमवर प्रत्येकी १५ सामने खेळवण्यात येणार आहेत. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन BCCI ने एकाच राज्यात आयपीएलचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी झालेल्या चुकांमुळे हा निर्णय घेतला गेला आहे. आता सर्व संघ महाराष्ट्रात दाखल झाल्यामुळे यजमान मुंबई इंडियन्सने ( MI) त्यांचे जंगी स्वागत केले. मुंबईच्या रस्त्यांवर MI ने अन्य ९ फ्रँचायझींसाठी लावलेले होर्डिंग्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात २६ मार्चला सलामीची लढत होणार आहे. स्पर्धेतील पहिला डबल हेडर साना २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रबॉर्न स्टेडियम आणि पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम यांच्यात होईल. या स्पर्धेत एकूण १२ डबल हेडर सामने होतील.
- ग्रुप अ - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
- ग्रुप ब - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स
मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार, तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ हैदराबाद, बंगळुरू, पंजाब, गुजरात व मुंबई यांच्याशी प्रत्येकी दोन, तर कोलकाता, राजस्थान, दिल्ली व लखनौ यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब, गुजरात व राजस्थान यांच्याशी प्रत्येकी दोन, तर मुंबई, कोलकाता, दिल्ली व लखनौ यांच्यासोबत प्रत्येकी १ सामना खेळणार आणि कोलकाता नाइट रायडर्सचा संघ मुंबई, राजस्थान, दिल्ली, लखनौ व हैदराबाद यांच्याशी प्रत्येकी दोन, तर चेन्नई, बंगळुरु, पंजाब व गुजरात यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.