Join us  

फ्रेंडशिप डे ला कोहलीने घेतली द ग्रेट खलीची भेट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ज्या हॉटेलमध्ये उतरलेला असतो तेव्हा कोहलीला भेटण्यासाठी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ लागलेली असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 11:14 AM

Open in App
ठळक मुद्देजसे कोहलीचे चाहते आहेत तसेच कोहलीला सुद्धा काही खास व्यक्तींबद्दल आकर्षण आहे.त्याला सुद्धा या खास पाहुण्यांना भेटण्याची ओढ लागलेली असते

कोलंबो, दि. 7- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला जातो किंवा तो ज्या हॉटेलमध्ये उतरलेला असतो तेव्हा कोहलीला भेटण्यासाठी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. चाहते तासनतास  त्याची वाट पाहत थांबलेले असतात. जसे कोहलीचे चाहते आहेत तसेच कोहलीला सुद्धा काही खास व्यक्तींबद्दल आकर्षण आहे. त्याला सुद्धा या खास पाहुण्यांना भेटण्याची ओढ लागलेली असते. त्यांना भेटून कोहलीला एक वेगळा आनंद मिळतो. 

रविवारी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने विराटने  WWE चा रेसलर 'द ग्रेट खली'ची भेट घेतली. विराटने खली बरोबर झालेल्या या भेटीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. द ग्रेट खलीला भेटणे खूपच आनंद देणारा अनुभव होता असे विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहीले आहे. 

रविवारीच भारताने श्रीलंके विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. द ग्रेट खलीने WWE च्या रिंगमध्ये भल्या भल्या दिग्गज रेसलरसना नमवले असून, बच्चेकंपनीमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे. 

‘आम्हाला विजयाची सवय लागली आहे’आमच्या संघाला विजयाची सवय लागली असून भविष्यातही ही मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० ने आघाडी घेतल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

भारताने रविवारी श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव व ५३ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारताने यापूर्वी २०१५ मध्ये श्रीलंकेचा त्यांच्याच भूमीत २-१ ने पराभव केला होता. आता भारताला १२ आॅगस्टपासून पल्लेकलमध्ये प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत विदेशात यजमान संघाचा सफाया करण्याची संधी आहे.कोहली म्हणाला, ‘पुन्हा मालिका जिंकल्यामुळे निश्चितच आनंद झाला आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आम्ही कसोटी क्रिकेटचे देश किंवा विदेश असे वर्गीकरण करीत नाहीत. आम्ही कसोटी क्रिकेटचा केवळ कसोटी क्रिकेट म्हणूनच विचार करतो. जेथे खेळतो तेथे विजय नोंदविण्यास इच्छुक असतो.’