ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली टीम इंडियाचा माजी कर्णधार झाला. विराटनं टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आणि आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. रोहितला कर्णधार बनवण्याच्या निर्णयाचे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं स्वागत केलं. रोहितची मानसिक कणखरता त्याला अव्वल दर्जाचा खेळाडू बनवते, असे पाकिस्तानचा माजी अष्टपैलू आफ्रिदी म्हणाला. जेव्हा गरज असते तेव्हा रोहित संयमीपणा दाखवतो आणि जेव्हा गरज असते तेव्हा आक्रमकता, असेही आफ्रिदी म्हणाला.
१७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रोहित टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. समां टीव्हीशी बोलताना आफ्रिदी म्हणाला,''रोहितचं कर्णधार बनणं अपेक्षितच होतं. मी डेक्कन चार्जर्स संघात असताना एक वर्ष त्याच्यासोबत खेळलो आहे. त्याचं शॉट सिलेक्शन कमालीचे आहे. संयम आणि आक्रमकता हे दोन्ही रूप रोहितमध्ये पाहायला मिळतात. टीम इंडियाच्या कर्णधारपदात बदल होणे अपेक्षित होते आणि रोहितलाच संधी मिळायला हवी होती, हे मी आधीच सांगितले होते.''
यावेळी आफ्रिदीनं टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली यानं कसोटी व वन डे संघाचेही नेतृत्व सोडायला हवं, असे मत व्यक्त केले. तो म्हणाला,''फक्त खेळाडू म्हणून खेळत राहण्याचा निर्णय आता विराटनं घ्यायला हवा. त्यामुळे त्याच्यावरील दबावही कमी होईल. त्याला अजून बरंच क्रिकेट खेळायचे आहे. संघाचे नेतृत्व करणे सोपं नसतं, त्यामुळे त्यानं क्रिकेट व त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटण्यासाठी कर्णधारपद सोडायला हवं.''