चेन्नई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आपल्या कारकिर्दीदरम्यान घेतलेल्या काही निर्णयांवर खंत व्यक्त केली. २०१९ मध्ये इंग्लंडच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप (वन-डे) स्पर्धेचा उल्लेख करताना ते म्हणाले की त्यात मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.निवड समिती अध्यक्ष म्हणून एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ अलीकडेच संपुष्टात आला. प्रसाद यांचा कार्यकाळ तसा चांगला राहिला असला तरी काही निर्णयांवर क्रिकेट जाणकार व प्रशंसकांनी टीका केली होती. त्यात रायुडूला विश्वकप संघात संधी न देण्याच्या निर्णयाचाही समावेश होता.
विश्वकप स्पर्धेपूर्वी रायुडूला चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून मजबूत दावेदार मानल्या जात होते, पण अचानक विजय शंकर याला प्राधान्य देण्यात आले. याबाबत खंत व्यक्त करताना प्रसाद म्हणाले, ‘अंबाती आमच्या योजनेनुसार विश्वकप संघाचा भाग होता. त्यामुळे निवड समितीने वेळोवेळी त्याचे मनोधैर्य उंचावले, पण अखेरच्या क्षणी विजय शंकरने बाजी मारली. या निर्णयाचे मला शल्य राहील. माझ्या मते, संपूर्ण निवड समिती सदस्यांना याचे वाईट वाटले होते.