खेळ कोणताही असो... त्याला चांगल्या मैदानाशिवाय शोभा येत नाही. मैदान चांगलं ठेवण्यासाठी अनेक हात रात्रंदिवस झटत असतात. पण त्यांना त्यांच्या या अप्रतिम कार्याचे श्रेय किंचितच मिळतं. काही अपवाद वगळता ग्राउंड स्टाफ पडद्यामागेच राहतात. मात्र, मागील वर्षी श्रीलंकेत पार पडलेल्या आशिया चषकाच्या स्पर्धेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. सततचा पाऊस आणि त्यात मैदानाची देखभाल करण्यासाठी झटणारे हात... त्यांची तळमळ आणि कष्ट याची क्रिकेट विश्वाला भुरळ पडली. भारतीय संघातील खेळाडूंनी देखील पडद्यामागील हिरोंच्या या कार्याला दाद दिली. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं श्रीलंकेतील ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला. आज आपण अशाच एका पडद्यामागील हिरोचा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत...
भारतात सतत कोणत्या ना कोणत्या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू असतात. सध्या रणजी ट्रॉफी आणि इतर काही देशांतर्गत स्पर्धा खेळवल्या जात आहेत. क्रिकेट पाहण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळची सत्रं आनंददायी असतात. 'स्पोर्ट्स स्टार' या क्रिकेट वेबसाइटच्या प्रतिनिधींनी विशाखापट्टणम येथील VDCA (Visakhapatnam District Cricket Association Cricket Stadium) स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधून त्यांचं कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
"पोटच्या मुलाप्रमाणे मैदानाला जपतो"
ग्राउंड स्टाफ सदस्यांपैकी एक असलेल्या आदी बाबूंनी स्टेडियमची कशी काळजी घेतली जाते याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "खेळाडूंना ज्या पद्धतीनं अशा परिस्थितीत खेळण्याची सवय आहे, तशीच आम्हाला देखील काम करण्याची सवय आहे. आम्ही दररोज आमचे काम करण्यासाठी तंदुरुस्त आणि निरोगी असणं आवश्यक आहे. मी मागील १९ वर्षांपासून ग्राउंड स्टाफचा भाग आहे. मैदानाची काळजी घेणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आम्ही रोज खेळपट्टीची देखभाल करतो, साफसफाई करणं आणि संपूर्ण मैदानाची निगा राखणं हे आमचं काम असतं. याशिवाय जेव्हा देशांतर्गत क्रिकेटचे सामने असतात. तेव्हा स्कोअरबोर्ड अर्थात धावफलक अद्यतनित करणं ही एक अतिरिक्त जबाबदारी असते."
पडद्यामागील हिरोंची कहाणी
तसेच मैदानाची देखभाल करण्यासाठी आम्ही एकूण १० जण आहोत. सामना असो वा नसो काही फरक पडत नाही, आम्ही आमच्या मुलाप्रमाणे ३६५ दिवस मैदानाची काळजी घेतो. आंतरराष्ट्रीय सामना असल्यास आणि पावसाची शक्यता असल्यास अधिक काळजी घेतली जाते. अशावेळी मॅच रेफरी आम्हाला कव्हर घालण्यासाठी किती वेळ लागू शकतो याबद्दल विचारतात. ते आमच्याकडून साधारणपणे पाऊस कोणत्या बाजूने येतो याची माहिती घेतात. या सर्व गोष्टींसाठी ते आमचा अनुभव विचारात घेतात, असेही ३७ वर्षीय आदी बाबू यांनी सांगितले.
मानधन आणि इतर बाबींबद्दल आदी बाबू सांगतात की, असोसिएशनतर्फे सर्व गोष्टी वेळेत पुरवल्या जातात. रोजचे जेवण, वेळेवर पगार, बोनस आणि वार्षिक वाढ देऊन ग्राउंड स्टाफ सदस्यांची चांगली काळजी घेतली जाते. कोविड काळातही आम्हाला आमचे पगार मिळाले. खासगी नोकरी करणाऱ्यांना या काळात मनस्ताप सोसावा लागला. पण, असोसिएशननं आम्हाला चांगली मदत केली. कोविड काळात मैदानाच्या देखभालीसाठी दोन तास पोलिसांची परवानगी घेऊन पाच जण यायचे.
Web Title: ground staff at the Visakhapatnam District Cricket Association Cricket Stadium, the heroes behind the scenes, have given an account of their work
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.