नागपूर - अतिव्यस्त वेळापत्रकावर टीका केल्यानंतर विराट कोहलीने आता संघातील सहकाऱ्यांसाठी पगारवाढीची मागणी केली आहे. त्याशिवाय विराटने बीसीसीआयच्या नफ्यात खेळाडूंचा वाटा वाढवून मागितल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या आधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विराट कोहलीनं हा मुद्दा उपस्थित केला आहे.
भारतीय संघातील आघाडीच्या (अ श्रेणी) खेळाडूंची कमाई दुप्पट नफ्यासह तीन लाख डॉलर म्हणजे जवळपास 20 कोटी रुपयांच्या घरात आहे. नवी दिल्लीत शुक्रवारी बीसीसीआयसोबत भारतीय संघाची बैठक होणार आहे. या बैठकीत भारतीय खेळाडूंच्या वतीनं विराट कोहली, माजी कर्णधार धोनी आणि मुख्य कोच रवी शास्त्री परागवाढीसह इतर मागण्यावर बोर्डासमोर मांडणार आहेत. सप्टेंबरमध्ये खेळाडूंसोबतचा करार संपष्टात आला असून, नवीन करारामध्ये खेळाडूंना मिळणारे मानधन वाढवावे अशी मागणी खेळाडूंकडून करण्यात येत आहे. त्यांची बाजू कर्णधार विराट कोहली मांडत असल्याचे वृत्त आहे.
बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क देण्याबाबत करार केला आहे. माध्यमसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपर्ट मर्डोकच्या मालकीच्या स्टार इंडिया वाहिनीसोबत 2018 ते 2022 पर्यंतच्या काळात आयपीएल प्रसारणाच्या हक्काचा करार केला आहे. या करारामुळे बीसीसीआयला स्टार इंडियाकडून 2.5 अब्ज डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे.
क्रिकेटच्या विविध फॉर्मॅटमधील कामगिरीच्या आधारे भारतीय संघातील खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात येते. या श्रेणीनुसार खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात येतो. अ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन, ब श्रेणीतील खेळाडूंना त्या खालोखाल तर क श्रेणीतील खेळाडुंना कमी मानधन देण्याची तरतूद आहे.
(आणखी वाचा - भारतीय संघाचे हे आहेत कसोटीतील पाच विराट विजय )
यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये भारतीय क्रिकेटपटूंना वार्षिक पगार म्हणून मिळणारी रक्कम ही जगातील इतर क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या रकमेपेक्षा कमी आहे, असं सांगत विराटनं यात वाढ करण्याची मागणी केली होती. तर, खेळाडूंना बोनसही मिळायला हवा, अशी मागणी संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेनं केली होती.
(आणखी वाचा - अन् कर्णधार विराट कोहलीची पाठराखण केली धोनीनं, BCCIच्या आडचणीत वाढ)