अहमदाबाद : ‘फायनल जिंकल्यानंतर काही क्षणात हार्दिक पांड्या आयपीएल चषकाचे प्रेमाने चुंबन घेताना दिसला. हे चित्र एखादा पिता आपल्या बाळाचे लाड करीत असल्यासारखे होते.’ अखेर त्याला कठोर मेहनतीचे फळ मिळाले होते. गुजरात टायटन्सने पदार्पणात लीगचे जेतेपद पटकाविले. हार्दिकने त्याची पत्नी नताशाची गळाभेट घेतली. वाईट दिवसात खंबीरपणे पाठीशी राहणारे कुटुंबीय आनंदाच्या क्षणीदेखील सोबत आहेत, याची खात्री पटली.
अष्टपैलू खेळाच्या बळावर फायनल जिंकून देणारा हार्दिक म्हणाला, ‘कुटुंबीयांकडून मिळत असलेल्या भरपूर प्रेमाच्या बळावरच मी यशस्वी ठरलो आहे.’ चमकदार जॅकेट आणि कानात हिऱ्याचे टॉप्स घालून खेळणारा हार्दिक सुरुवातीच्या काळात ग्लॅमरच्या मस्तीत वावरणारा युवा वाटायचा. बेपर्वा वृत्तीचा युवा खेळाडू ते जबाबदार कर्णधार बनण्यापर्यंतचा प्रवास यशस्वी कथानकासारखा आहे. पत्नी नताशा, मुलगा अगस्त्य, भाऊ कृणाल आणि वैभव, वहिनी पंखुडी हे सर्वजण नात्याने घट्ट बांधले गेले आहेत. सर्वजण हार्दिकच्या पाठीशी उभे राहतात. हार्दिक म्हणतो, ‘नताशा फारच भावुक आहे.
मी चांगली कामगिरी केली की ती भावुक होते. तिने माझ्या वाटचालीत अनेक चढ-उतार पाहिले. मी किती मेहनत घेतली, याची तिला जाणीव आहे. माझे कुटुंबीय माझी ताकद आहेत. कठीण स्थितीत त्यांनी मला सावरले, मानसिक आधार दिला. मी फोन करताच भाऊ आणि वहिनी रडायला लागले. हे आनंदाश्रू होते. माझ्यामागे असे लोक असतील तर मी चांगला खेळू शकतो, याची मला जाणीव आहे.’
पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला, ‘मला पुढे येऊन नेतृत्व करणे आवडते. त्यातही स्वत:ला सिद्ध करणे हे माझे वैशिष्ट्य आहे. संघाकडून मी काही अपेक्षा करणार असेल तर त्याआधी स्वत:ची कामगिरी सुधारायला हवी. त्यानंतरच सहकाऱ्यांकडून माफक अपेक्षा बाळगता येईल.’ सहा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हार्दिक चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८ चा अंतिम सामना खेळला असून, टी-२० विश्वचषक २०१६ आणि वन डे विश्वचषक-२०१९ चा उपांत्य सामनादेखील खेळला आहे.
९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. यंदा विश्वचषक खेळणे त्याचे लक्ष्य असेल. हार्दिक म्हणाला, ‘भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आहे. मी नेहमी संघ सर्वप्रथम ही बाब डोळ्यापुढे ठेवून खेळतो. संघाला आयसीसी जेतेपद मिळवून देणे हा माझा निर्धार आहे. ’ याआधी मुंबई इंडियन्ससोबत चारवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात हार्दिकचा वाटा राहिला. यंदा गुजरातसाठी त्याने ही खास कामगिरी केली.