GT vs CSK, IPL 2023: IPL 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल(दि.28) रोजी होणार होता, पण पावसामुळे सामना होऊ शकला नाही. बराचवेळ वाट पाहूनही पाऊस थांबला नाही, त्यामुळे कालचा सामना राखीव दिवशी म्हणजेच आज होणार आहे. काल गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामना पाहण्यासाठी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरले होते. पण, यावेळी एक विचित्र घटना घडली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्टेडियममध्ये बसलेली एक महिला एका पोलिसाला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती महिला खूप रागात दिसत असून, पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालते. त्यानंतर पोलिसाच्या कानाखाली चापटा मारते आणि त्याला खाली ढकलते.
पोलीस कर्मचारी आणि महिलेमध्ये कोणत्या कारणामुळे वाद झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेच्या आजूबाजूला उभे असलेले प्रेक्षक पोलीस कर्मचाऱ्याला निघून जाण्यास सांगतात. सोशल मीडियावरील काही युजर्सचे म्हणणे आहे की, व्हायरल व्हिडिओ पूर्ण नाही. महिलेने पोलिसाला 4-5 वेळा कानाखाली चापट मारली आहे.
पोलीस मद्यधुंद होता का?महिलेने मारल्यानंतरही पोलिसाने तिला काहीच प्रत्युत्तर दिले नाही. मात्र, सोशल मीडियावरील काही युजर्सचे असेही म्हणणे आहे की, पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत होता आणि त्यामुळेच आजूबाजूला उभे असलेले लोक महिलेला रोखण्याचा प्रयत्न करत नव्हते. कारण काहीही असो, हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.