Join us  

GT vs LSG: आयपीएलमध्ये आज नवा इतिहास रचला जाणार, स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडणार 

IPL 2023: आयपीएलमध्ये आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना लखनौ सुपरजायंट्सच्या संघाशी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारा हा सामना सर्वार्थाने खास ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 10:13 AM

Open in App

आयपीएलमध्ये आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना लखनौ सुपरजायंट्सच्या संघाशी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारा हा सामना सर्वार्थाने खास ठरणार आहे. या समन्यात हार्दिक आणि कृणाल या पांड्या ब्रदर्सच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी लागणार आहे. गुजरात आणि लखनौचे संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. याआधी झालेल्या सामन्यात गुजरातने ७ धावांनी सनसनाटी विजय मिळवला होता.

या सामन्यात गुजरात टायटन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. तर नियमित कर्णधार लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्या लखनौ सुपरजायंट्सची कप्तानी करणार आहे. हार्दिक पांड्याने गतवर्षी गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले होते. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याचं नेतृत्व करत असल्याने कृणाल पांड्याकडेही नेतृत्वाचा अनुभव आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये दोन भाऊ दोन वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. गुजरातचा संघ सध्या १४ गुणांसह गुणतक्त्यात अव्वलस्थानी आहे. दरम्यान, कृणाल पांड्याने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच नेतृत्व केलं होतं. मात्र तो सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. दरम्यान, लखनौच्या संघाला या सामन्यात लोकेश राहुल आणि जयदेव उनाडकट यांची उणीव भासणार आहे. लखनौचा संघ ११ गुणांसह गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईविरुद्धचा लखनौचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर त्याआधी बंगळुरूकडून लखनौला पराभूत व्हावे लागले होते. मात्र लोकेश राहुल याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता.  

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्सहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्या
Open in App