Join us  

"गुढी उभारून प्रार्थना करतो की नवीन वर्षात..."; सचिनने पत्नी अंजलीसोबत पोस्ट केला खास फोटो

सचिनने आपल्या घरात सपत्निक गुढीपूजन केले आणि खास ट्वीटही केले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 2:51 PM

Open in App

आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाची सुरूवात. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि जिथे-जिथे मराठी माणसे राहतात तेथे या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढली जाते. ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहात मिरवणूक निघते. महिलावर्ग नटून थटून शोभायात्रेत सहभागी होतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्याशिवाय प्रत्येक जण आपल्या घरात सुखाची-मांगल्यांची गुढी उभारतात आणि गुढीपूजन करून साकडे घालतात. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही याबाबतचा फोटो पोस्ट केला आहे.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जरी जगविख्यात फलंदाज असला तरी तो मराठी सणांचा नेहमीच आदर करतो आणि आपल्या घरी उत्साहात सण-उत्सव साजरे करतो. आजही सचिनने पत्नी अंजलीसोबत गुढीपाढवा साजरा केला. त्याने सपत्नीक गुढीपूजन केले आणि एक विशेष मागणं मागितलं. "आज गुढी उभारून ही प्रार्थना करतो की नवीन वर्षात सगळ्यांचा उद्धार होवो. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!" असे ट्विट करत सचिन तेंडुलकरने साऱ्यांना सदिच्छा दिल्या.

दरम्यान, सचिन गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचं विधान केलं. सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि याआधीचे अध्यक्ष देखील माजी क्रिकेटपटू होते. मग भविष्यात तू बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पाहायला मिळणार आहेस का? असं सचिनला विचारण्यात आलं असता त्यानं अगदी मजेशीर उत्तर दिलं. "मी वेगवान गोलंदाजी करत नाही", असं सचिन म्हणाला. (रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली मध्यम गतीनं गोलंदाजी करायचे) एका दौऱ्यात जेव्हा गांगुलीनं विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा तो 140kmph गतीनं गोलंदाजी करण्याचं बोलत होता. पण त्यानंतर त्याची कंबर दुखायला लागली होती. सचिननं याच मुद्द्यावर भाष्य करत मी १४० च्या गतीनं गोलंदाजी करू शकत नाही असं मिश्किलपणे म्हटलं आणि बीसीसीआय अध्यक्षपदाच्या प्रश्नाला टाळलं.

टॅग्स :गुढीपाडवासचिन तेंडुलकरट्विटर
Open in App