Gujarat Floods News : देशातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत विविध जिल्ह्यांत १५ जणांचा मृत्यू झाला असून २३ हजारांहून अधिक लोकांना हलवण्यात आले आहे. आता लोकप्रतिनिधी असलेली रिवाबा जडेजा पावसाने त्रस्त झालेल्या लोकांसाठी मैदानात आली आहे. ती भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आहे. रिवाबा जडेजा जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आली.
रिवाबाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रिवाबा पाण्याने भरलेल्या रस्त्यांवर फिरताना आणि लोकांना भेटताना दिसते. तिने आपल्यासोबत रेस्क्यू टीम आणली होती, ज्यांनी लोकांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली. तसेच पावसाने बाधित झालेल्या लोकांना रेशनचे वाटप करण्यात आले. रिवाबा जडेजाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, निसर्गासमोर कोणाचे काहीच चालत नाही... तरीही गरज असेल तेव्हा आपल्या लोकांचे संरक्षण आणि मदत करू शकते.
आपल्या आमदार पत्नीचे कार्य पाहून रवींद्र जडेजा भारावला. त्याने रिवाबाने केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. कमेंटच्या माध्यमातून जड्डू म्हणाला की, तू खूप चांगले काम करत आहेस, मला तुझा अभिमान वाटतो. इतरही लोकांनी रिवाबाच्या या कामाला दाद दिली.
जड्डूचा संघर्षमय प्रवास दरम्यान, ६ डिसेंबर १९८८ मध्ये रवींद्र जडेजाचा जन्म गुजरातच्या जामनगर येथील नवागाम गड सिटी येथील गुजराती राजपूत कुटुंबात झाला. रवींद्रने भारतीय सैन्यात जावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये रवींद्रची आई लता यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यावेळी रवींद्रने क्रिकेट सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. २०१६ मध्ये रवींद्र आणि रिवाबा यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव निध्याना असे आहे.