अहमदाबाद : यंदाच्या आयपीएलमधील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या गुजरातने घरच्या मैदानावर खेळताना शुक्रवारी गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला ३५ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरातने २० षटकांत ३ बाद २३१ धावांचे एव्हरेस्ट उभारले. यानंतर चेन्नईचा डाव २० षटकांत ८ बाद १९६ धावांवर रोखला गेला.
गुजरातने रचिन रवींद्र (१), अजिंक्य रहाणे (१) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (०) यांना स्वस्तात बाद करत चेन्नईची तिसऱ्याच षटकात ३ बाद १० धावा अशी अवस्था केली. डेरील मिचेल आणि मोईन अली यांनी चौथ्या गड्यासाठी ५७ चेंडूंत १०९ धावांची भागीदारी केली. मोहित शर्माने मिचेलला १३व्या, तर मोईनला १५व्या षटकात बाद करून गुजरातला पुनरागमन करून दिले. ही पकड गुजरातने अखेरपर्यंत कायम राखत बाजी मारली. मोहितने धोकादायक शिवम दुबेलाही मोक्याच्यावेळी बाद केले. महेंद्रसिंग धोनीने तीन षटकार व एक चौकार मारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
त्याआधी, गुजरातने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या जोरावर भक्कम धावसंख्या उभारली. दोघांनी १०४ चेंडूंत २१० धावांची दमदार सलामी दिली. सुदर्शन आणि गिल यांनी प्रत्येकी ५० चेंडूंत शतक झळकावत चेन्नईचे मानसिक खच्चीकरण केले. आयपीएलमध्ये एका डावात दोन शतके झळकण्याची ही केवळ तिसरी वेळ ठरली. अखेर १८व्या षटकात तुषार देशपांडेने सुदर्शन आणि गिलला बाद केले. यानंतर डेव्हिड मिलर आणि शाहरुख खान यांना अपेक्षित फटकेबाजी करता न आल्याने गुजरातला अडीचशे धावांचा पल्ला पार करता आला नाही
साई सुदर्शन २५ डावांमध्ये एक हजार आयपीएल धावा पूर्ण करणारा वेगवान भारतीय फलंदाज ठरला. त्याने ऋतुराज गायकवाड आणि सचिन तेंडुलकर यांचा (प्रत्येकी ३१ सामने) विक्रम मोडला. तसेच, कमी सामन्यांत ही कामगिरी करणारा सुदर्शन हा मॅथ्यू हेडनसह संयुक्तपणे तिसरा वेगवान फलंदाज ठरला.
सर्व प्रकारच्या टी-२० मध्ये मिळून सहा शतके झळकावणारा शुभमन गिल हा सहावा भारतीय ठरला.
गुजरातकडून आयपीएलमध्ये पाच शतकी खेळी झाल्या असून, यापैकी चार शतके एकट्या गिलने झळकावली असून, एक शतक साई सुदर्शनने झळकावले आहे.
Web Title: Gujarat maintained the challenge; Chennai lost by 35 runs; Gill, Sudarshan hit a century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.