अष्टपैलू हार्दिक पांड्याची आगामी आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली आहे. २०१५ मध्ये मुंबईच्याच संघातून पांड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली. कायरन पोलार्ड आणि हार्दिक मागील काही वर्षे मुंबईच्या संघाचे हुकमी एक्के म्हणून ओळखले जायचे. पण, २०२२ च्या आयपीएलपासून हार्दिक गुजरातच्या फ्रँचायझीकडे गेला आणि त्याने सलग दोन वर्ष गुजरात टायटन्सच्या संघाला अंतिम फेरीत पोहचवले. अशातच हार्दिकचा मुंबईच्या फ्रँचायझीमध्ये परतण्याचा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे.
गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी यांनी हार्दिक पांड्यालामुंबई इंडियन्समध्ये खरेदी केले जात असल्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्या इच्छेनुसार आम्ही मुंबईच्या संघात पाठवत असून, त्याच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. हार्दिकने गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून खूप चांगली कामगिरी केली. त्याने त्याचा जुना संघ मुंबई इंडियन्समध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती जिथूनच त्याने खेळाला सुरुवात केली होती. आम्ही त्याच्या या निर्णयाचा आदर करतो आणि त्याला चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे सोलंकी यांनी स्पष्ट केले.
पांड्याचे 'हार्दिक' स्वागत गुजरातच्या संघातून बाहेर पडल्यानंतर हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट केला, ज्यामध्ये तो भावूक दिसला. हार्दिक म्हणतो की, चला, सुरू करू या... रोहित, बुमराह, सूर्या, इशान, पॉली (पोलार्ड) आणि मलिंगा… मी परत आलो आहे. मुंबईत परत येण्याचा हा क्षण माझ्यासाठी अनेक कारणांसाठी खूप खास आहे. माझा क्रिकेट प्रवास २०१५ मध्ये इथूनच सुरू झाला. जेव्हा मी पाहतो माझ्या दहा वर्षांच्या प्रवासात, दहा वर्षांचा हा काळ खूप खास आहे. तो अजून संपलेला नाही... मी पुन्हा तिथेच आलो आहे, जिथून मी सुरूवात केली होती.
तसेच या काळात मी शक्य ते सर्वकाही साध्य केले. माझे आकाश आणि संपूर्ण अंबानी कुटुंबाशी एक खास नाते आहे. हे नाते खूप भावनिक आहे, इथे परतल्याने मला घरी परतल्यासारखे वाटते. मुंबईच्या फ्रँचायझीसह चाहत्यांनी मला खूप साथ, प्रेम दिले... मला आशा आहे की, पुढील काळात देखील ते असेच कायम राहील. आम्ही एक संघ म्हणून इतिहास रचला आणि आता मी पुन्हा एकदा काही आश्चर्यकारक क्षण निर्माण करण्यास उत्सुक आहे. तुमच्या हार्दिक स्वागताबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत पांड्याने सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.