kane williamson injury ipl 2023 । नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2023) १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. गतविजेत्या टायटन्सने चेन्नईला पराभवाची धूळ चारून विजयी सलामी दिली. मात्र, गुजरातचा स्टार खेळाडू केन विल्यमसनच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडचे वादळ रोखण्याच्या प्रयत्नात विल्यमसनला दुखापत झाली अन् त्याला संपूर्ण आयपीएलला मुकावे लागले. अशातच विल्यमसनच्या दुखापतीने न्यूझीलंडच्या संघाच्या देखील अडचणी वाढवल्या आहेत.
कारण आगामी वन डे विश्वचषकाला देखील केन विल्यमसन मुकणार आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, विल्यमसनची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला आणखी काही महिने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाला न्यूझीलंडचा दिग्गज मुकणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा खेळाडू विल्यमसन संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाला आहे.
ऋतुराजचा षटकार रोखणं विल्यमसनला भोवलंखरं तर यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चेन्नईविरूद्धच्या सामन्यातील १३व्या षटकांत विल्यमसनला दुखापत झाली. ऋतुराज गायकवाडने मारलेला षटकार रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या विल्यमसनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने खेळ काही वेळ थांबवण्यात आला होता. विल्यमसनने शानदार क्षेत्ररक्षण करून षटकार रोखला याशिवाय झेल देखील पकडला मात्र सीमारेषेच्या बाहेर जाण्याआधी त्याने चेंडू आत मैदानात फेकला. सामना झाल्यानंतर विल्यमसनला स्कॅनसाठी नेण्यात आले, त्यानंतर समोर आले की त्याला ठीक होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. विल्यमसनच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून साई सुदर्शनने फलंदाजी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"