भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज गुरिंदर संधू याने बीग बॅश लीग स्पर्धेच्या सुरू असलेल्या हंगामात पर्थ स्कोचर्स संघाविरूद्ध जबरदस्त हॅटट्रिक घेतली. सिडनी थंडर संघाकडून क्वीन्सलँडच्या कॅरेरा ओव्हल मैदानावर खेळताना त्याने गुरूवारी ही कामगिरी केली. संधूची ही ऑस्ट्रेलियन देशांतर्गत स्पर्धांमधील तिसरी हॅटट्रिक ठरली. संधू्च्या हॅटट्रिकच्या जोरावर थंडरने स्कोचर्स संघाला १३३ धावांवर रोखले.
पंजाबमध्ये जन्मलेल्या गुरिंदर संधूने १२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉलीन मुनरोचा बळी टिपला. त्यानंतर १६व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीस आला. त्यावेळी त्याने पहिल्या चेंडूवर आरोन हार्डी आणि दुसऱ्या चेंडूवर लॉरी इवॅन्स हा दोघांना माघारी धाडलं आणि आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने एकूण चार विकेट्स घेतल्या.
पाहा त्याची हॅटट्रिक-
हॅटट्रिकबद्दल बोलताना संधू म्हणाला की खास कामगिरी करून मला नक्कीच आनंद झाला. संघ जिंकला याचा आनंद जास्त आहे. गेल्या वर्षीच्या कामगिरीनंतर मी पुन्हा स्पर्धा खेळेन का याबद्दल जरा शंकाच होती. पण जेव्हा तुम्ही संघाचा विजयात मोलाचा वाटा उचलता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास दुणावतो.
दरम्यान, सिडनी थंडर संघाने १३४ धावांचे माफक आव्हान सहज पूर्ण केलं. जेसन संघा (३४), मॅथ्यू गिल्क्स (३२) आणि अलेक्स हेल्स (२६) हे तिघे सर्वाधिक धावसंख्या करणारे फलंदाज ठरले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना १८ षटकांचा करण्यात आला होता. पण थंडर संघाने १७व्या षटकातच सामना जिंकला.