हरारे : काल झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडवर पाच गड्यांनी विजय मिळवत इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. या आधी दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजने विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती. राशिद खान याने ४० धावा देत तीन गडी बाद केले. त्यामुळे अफगाणने आयर्लंडला २०९ धावांवर रोखले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने हे लक्ष्य ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ४९.१ षटकांत गाठले.
यूएईकडून झालेल्या पराभवामुळं झिम्बाब्वेचा संघ 1983 नंतर पहिल्यांच विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास अपात्र ठरला आहे. 1983 नंतर झिम्बाब्वेच्या संघावर असा प्रसंग पहिल्यांदाच आला की विश्वचषक खेळू शकणार नाही. पात्रता फेरीत खेळताना गुरूवारी यूएईकडून 3 गड्यांनी झालेल्या पराभवामुळे झिम्बाब्वेचा 2019च्या क्रिकेट विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगल्यात जमा झाले होते. त्यांच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा पावसावर होत्या मात्र अफगाणिस्तान-आयर्लंडच्या सामन्यामध्ये पाऊस आला नाही. त्यामुळं झिम्बाब्वेच्या संघाच्या राहिलेल्या अपेक्षा धुतल्या गेल्या.
अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आमच्याकडे अनेक संधी चालून आल्या होत्या. आमचा आतापर्यंतचा खेळ चांगला होता. परंतु, आजचा दिवस आमच्यासाठी निराशाजनक ठरला, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रेम क्रिमरने पराभवानंतर दिली.
हे संघ खेळणार विश्वचषकात -
अ गट -
- भारत
- पाकिस्तान
- श्रीलंका
- बांग्लादेश
- अफगाणिस्तान
ब गट
- इंग्लंड
- ऑस्ट्रेलिया
- दक्षिण आफ्रिका
- न्यूझीलंड
- वेस्ट इंडिज