jay shah bcci । नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना हॉल ऑफ फेम पुरस्कार (Hall of Fame Award 2023) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. खरं तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक फोटो शेअर केला असून यामध्ये जय शाह हा पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढअलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ जाहीर केली. आता या घोषणेनंतर रणजी ट्रॉफीची स्पर्धा जिंकणाऱ्या संघाची बक्षीस रक्कम जवळपास दुप्पट झाली आहे. तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजेत्या आणि उपविजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत तीन पटीने वाढ झाली आहे. महिला क्रिकेटच्या बक्षीस रकमेत देखील बंपर वाढ झाली आहे. आता महिला खेळाडूंना पूर्वीपेक्षा जवळपास आठपट जास्त पैसे मिळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
देशांतर्गत क्रिकेटला मिळणार अधिक चालना दरम्यान, आतापर्यंत रणजी ट्रॉफीतील विजेत्या संघाला दोन कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळत होते, मात्र आता ते पाच कोटी रुपये करण्यात आले आहे. यापूर्वी रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला १ कोटी रुपये मिळत होते, मात्र आता ३ कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघाला ५० लाख रुपयेही देण्यात येणार आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा अर्थात विजय हजारे ट्रॉफीच्या विजेत्या संघाला आधी ३० लाख रुपये मिळत होते, पण आता १ कोटी रुपये दिले जातील. तर दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला 15 लाखांऐवजी 50 लाख रुपये मिळणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"