नवी दिल्ली : ‘न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपासून भारतीय संघाच्या पुनर्बांधणीची सुरुवात झाली पाहिजे. २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी अष्टपैलू हार्दिक पांड्याची भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार म्हणून निवड करण्यात यावी,’ असे स्पष्ट मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवड समितीची माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी मांडले.
श्रीकांत यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हटले की, ‘जर मी निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर हार्दिक पांड्याला २०२४ च्या विश्वचषकासाठी कर्णधार नेमण्याचे सांगितले असते. मी हा निर्णय थेट घेतला असता. तसेच, आतापासूनच संघाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली पाहिजे. हे काम न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून सुरू झाले पाहिजे.’
श्रीकांत यांनी पुढे म्हटले की, ‘भारतीय संघाला आजपासूनच सुरुवात करावी लागेल. विश्वचषक स्पर्धेसाठी तुम्हाला अनेक गोष्टी समजून घ्यावा लागतात आणि याची सुरुवात दोन वर्षांआधी करावी लागते. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे आहे, जे काही प्रयोग करायचे आहेत, ते एका वर्षाच्या आत करा आणि २०२३ पर्यंत संघ तयार करा. हाच संघ विश्वचषकात खेळेल, हेही निश्चित करा.’ शुक्रवारपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी ३ सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळेल. या मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक भारताच्या टी-२० मालिकेत नेतृत्व करेल.
श्रीकांत यांनी सांगितले की, ‘भारताला वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूची नितांत गरज आहे. १९८३ विश्वचषक, २०११ विश्वचषक आणि २००७ च्या विश्वचषक विजेतेपदांवर जरा नजर टाका. यामध्ये आपण का बाजी मारली, कारण तेव्हा आपल्याकडे अधिक प्रमाणात वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू होते. तसेच, काही खेळाडू असेही होते जे फलंदाजीसह गोलंदाजीही करण्यास सक्षम होते. त्यामुळे अशा खेळाडूंना ओळखा, जसे की दीपक हुडा. त्याच्यासारखे अन्य खेळाडूही असणार.’
केवळ एकाच कर्णधारावर अवलंबून राहू नकाभारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने म्हटले की, ‘कर्णधार बदलल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील, असे मी म्हणणार नाही. पण हार्दिक पांड्याच्या बाबतीत एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की, तो वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहे आणि त्याच्यासोबत दुखापतीही जुळलेल्या आहेत. मला हेच सांगायचे आहे की, जर तुमचा कर्णधार विश्वचषक स्पर्धेआधी दुखापतग्रस्त झाला आणि तुमच्याकडे नेतृत्व करणारा दुसरा खेळाडू नसेल, तर मोठी अडचण होईल.’