- दिनेश पाटील
दिव्यांगांच्या जीवनात काही क्षण आनंदाचे यावेत व त्यांनाही खेळण्याचा अधिकार आहे, या उद्देशाने वाडेकर यांनी सातत्यपूर्ण ३० वर्षे कोणतेही मानधन न घेता खूप कष्ट घेतले.
क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ. सर्वसामान्यांना त्याचे वेड आहेच, पण दिव्यांगांनाही हा खेळ खेळण्यात खूप आनंद मिळतो. दिव्यांगांना हा आनंद देण्याचे महत्वपुर्ण काम अजित वाडेकर यांनी केले.
दिव्यांग क्रिकेट खेळू शकतात, यावर ३० वर्षांपूर्वी कोणाचा विश्वास बसत नव्हता. तथापि १९७१ साली अजित वाडेकर आणि त्यांचे सहकारी यांनी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांना हरवून प्रथमच परदेशात कसोटी मालिका जिंकली. या विजयी संघाचे मुंबई विमानतळावर आगमन होताच त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच विमानतळ ते ब्रेबॉर्न स्टेडियमपर्यंत प्रचंड विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी फार मोठ्या संख्येने जनतेने त्यांचे स्वागत केले. यामध्ये अपंग बांधव पुष्पहार घेऊन रस्त्यावर उभे होते. वाडेकर यांनी या चाहत्यांकडे पाहताच मिरवणूक थांबवली आणि ते खुल्या कारमधून उतरले. त्यांनी स्वत:हून त्यांच्याकडे जात पुष्पहार स्वीकारला. दिव्यांगांचे हे प्रेम पाहून वाडेकर खूप भारावले होते. त्याचक्षणी त्यांनी दिव्यांगांसाठी काही तरी करायचे, असा निर्धार केला.
१९८८ साली त्यांना आपली इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली. १९८८ साली वाडेकर यांनी खास दिव्यांगांसाठी विशेष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले. त्याचबरोबर आॅल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर दी फिजिकली चॅलेंज्ड संस्थेचीही (एआयसीएएफसी) स्थापना फेलोशिप आॅफ दी फिजिकली हॅन्डीकॅप्ड (एफ.पी.एच.) हाजी अली, मुंबई येथे झाली. या संस्थेची सुरुवात दोन संघांच्या सामन्याने झाली. पण नंतर वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची जोमाने वाटचाल सुरू झाली. आज भारतातील २८ राज्यांत संस्थेच्या मान्यताप्राप्त २८ राज्य संघटना कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे या संघटनांच्या मान्यतेने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दरवर्षी होत असते.
दिव्यांगांच्या जीवनात काही क्षण आनंदाचे यावेत व त्यांनाही खेळण्याचा अधिकार आहे, या उद्देशाने वाडेकर यांनी सातत्यपूर्ण गेली ३० वर्षे कोणतेही मानधन न घेता खूप कष्ट घेतले. विशेष म्हणजे त्यांच्या कार्याची दखल ‘सर डॉन ब्रॅडमन’ यांनीही घेतली होती. ब्रॅडमन यांनी वाडेकरांना पत्र लिहून सोबत स्वाक्षरीसहित स्वत:चे छायाचित्र पाठवून वाडेकरांच्या कार्याचा गौरव केला होता. दिव्यांगांसाठी क्रिकेट ही त्यांची जणू ‘सेकंड इनिंग’च म्हणावी लागेल. वाडेकरांचे हे कार्य सदैव दिव्यांगांना प्रेरणादायक ठरेल.
खेळाडूंमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, राष्ट्रीय एकात्मता इ. गुणांचा दिव्यांगांच्या जीवनामध्ये विकास करण्यात वाडेकर यांनी केलेले हे काम अभूतपूर्व आहे. सन २००२ साली इंग्लंडचा संघ भारतात आला होता. त्या वेळी दिव्यांगांसाठी तीन एकदिवसीय सामने भारतात
झाले होते. हे तिन्ही सामने भारताने जिंकले होते. इतकेच नव्हे तर दोन वर्षांपूर्वी झालेल्या पाच देशांचा सहभाग असलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा बांगलादेशच्या यजमानपदाखाली झाली होती.
या स्पर्धेत सहभागी होत भारतीय खेळाडूंना आपले कौशल्य जगापुढे सादर करण्याची संधी मिळाली. हे सर्व शक्य झाले ते केवळ वाडेकर सरांच्या पुढाकार आणि सहाकार्यामुळे. वाडेकर यांचे हे महान कार्य दिव्यांग खेळाडूंना सदैव प्रेरणादायी ठरेल हे नक्की. पण, वाडेकर यांच्या जाण्याने दिव्यांग क्रिकेटपटूंचा आधार गेला, हेही तेवढेच खरे आहे.
(लेखक हे ‘एआयसीएएफसी’चे खजिनदार आहेत.)
Web Title: handicap cricketers lost their support after the death of ajit wadekar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.