मुंबई : आयुष्यभर धडपडत असलेल्या दिव्यांगांमध्ये जगण्याची, खेळण्याची उमेद निर्माण करण्यासाठी आयोजित आठव्या एलआयसी चषक आंतरविभागीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्यापासून मुंबईच्या पोलीस जिमखान्यावर होणार आहे . पाच विभागीय संघाचा सहभाग असलेल्या या तीनदिवसीय स्पर्धेत दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील लढतीने दिव्यांगांच्या फटकेबाजी सुरूवात होईल. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता दिव्यांग क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
शरीराने दुबळे असूनही क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडण्याचे ध्येय गाठणाऱया दिव्यांग क्रिकेटपटूंचा अंगावर शहारे आणणारा खेळ पाहण्याची संधी मुंबईकर क्रीडाप्रेमींना उद्या शुक्रवारपासून लाभेल. ज्या देशात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि खेळाडूंना देवाचा दर्जा दिला जातो, अशा आपल्या देशात दिव्यांगांचे क्रिकेट नेहमीच उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले आहे. मात्र अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील दिव्यांगाना आपल्या क्रिकेटचे कौशल्य दाखविताना येईल. देशभरातील झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर त्यात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पाच विभागीय संघ बनविण्यात आले आहेत. या स्पर्धेत एकंदर दहा साखळी सामने खेळविले जाणार असून या तीनदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना 1 एप्रिलला नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर रंगेल. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे दिनेश सैनी, दशरथ जामखंडी, सौरभ रवालिया आणि बलविंदर सिंगसारखे खेळाडूही खेळताना दिसतील.