यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान कर्णधारपद सोडण्याबाबत धक्कादायक दावे करणाऱ्या हनुमा विहारीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आंध्र क्रिकेट असोसिएशनने हनुमा विहारीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून आंध्र क्रिकेट संघटनेने सांगितले की, राज्य संघटनेने हनुमा विहारीविरोधात चौकशी सुरू केली आहे. हनुमा विहारीने या रणजी हंगामाच्या सुरुवातीला आपल्याला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप केला होता.
आंध्र क्रिकेट संघटनेने प्रसिद्ध केलेले पत्रक हनुमा विहारीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरून शेअर केलं आहे. तसेच त्यावर प्रयत्न सुरू ठेवा अशी खोचक टिप्पणी केली आहे. या पत्रकात म्हटले आहेकी, हनुमा विहारीकडून झालेला आक्षेपार्ह भाषेचा वापर आणि सहकाऱ्यांसोबत अपमानास्पद वर्तनाबाबत सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि एसीएच्या प्रशासकांकडून माहिती मिळाली होती. आता आंध्र प्रदेश क्रिकेट संघटना या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करणार आहे. तसेच योग्य कारवाई केली जाईल.
हनुमा विहारीने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रणजी करंडक २०२३-२४ मध्ये आम्ही अखेरपर्यंत खूप संघर्ष केला. मात्र आम्ही यशस्वी झालो नाही. पुन्हा एकदा उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत व्हावं लागल्याने माझी निराशा झाली आहे. मात्र ही पोस्ट काही फॅक्टबाबत आहे. ते मी समोर ठेवू इच्छितो. बंगालविरोधात पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो. त्या सामन्यादरम्यान, मी १७ क्रमांकाच्या खेळाडूवर ओरडलो. त्याने त्याच्या वडिलांकडे (ते राजकीय नेते आहेत) तक्रार केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी संघटनेला माझ्याविरोधात कारवाई करण्यास सांगितले. गतवर्षी अंतिम सामन्यात खेळणाऱ्या बंगालविरोधात आम्ही ४१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता. मात्र मला कुठल्याही चुकीविना राजीनामा देण्यास सांगितले गेले.
पोस्टमध्ये हनुमा विहारीने पुढे सांगितले की, मी वैयक्तिकरीत्या कुठल्याही खेळाडूला कधीही काही म्हटलेलं नाही. मात्र संघटनेने विचार केला की, मागच्या वर्षी आपलं शरीर पणाला लावून खेळणाऱ्या आणि मागच्या ७ वर्षांत ५ वेळा आंध्र प्रदेशला बाद फेरीत पोहोचवणाऱ्या फलंदाजापेक्षा तो खेळाडू अधिक महत्त्वाचा आहे. मला या गोष्टीचा खूप खेद वाटला. मात्र मी खेळ आणि माझ्या संघाचा सन्मान कर असल्याने मी या हंगामात या संघाकडून खेळणं सुरू ठेवलं. दु:खद बाब म्हणजे आपण जे सांगू ते खेळाडूंनी ऐकावं आणि आपल्यामुळेच खेळाडू इथे आहेत, असं संघटनेला वाटतं.
विहारीने पुढे लिहिलं की, मला अपमानित आणि लाजिरवाणे झाल्यासारखे वाटले. मात्र मी त्याबाबतच्या भावना आजपर्यंत व्यक्त केल्या नव्हत्या. आता आंध्रकडून कधीच खेळायचं नाही, असा निर्णय मी घेतला आहे. माझं या संघावर प्रेम आहे. ज्याप्रकारे आम्ही या हंगामात आगेकूच करतोय, ते मला आवडले आहे. मात्र आम्ही पुढे जावं, असं संघटनेला वाटत नाही, असाही टोला हनुमा विहारी याने लगावला.