भारतात कोरोनाच्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दिवसाला जवळपास साडेतीन लाखांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशात अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले आहेत. भारताच्या कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू हनुमा विहारी ( Hanuma Vihari) आपल्या मित्रांच्या व चाहत्यांच्या मदतीनं कोरोना रुग्णांना मदत करत आहे. याचा त्यानं कुठेच गाजावाजाही केला नाही. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची सोय करण्यापर्यंत सर्व मदत विहारी व त्याचे सहकारी करत आहेत.
कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी ब्रिटनमध्ये असूनही विहारीनं ट्विटर हँडलच्या मदतीनं १०० स्वयंसेवकाची टीम तयार केली आहे. यात आंध्र प्रदेश, तेलंगना आणि कर्नाटक येथील काही मित्रांचा समावेश आहे. 27 वर्षीय फलंदाजानं PTIसोबत बोलताना सांगितले की,''मला माझ्या कामाचा गाजावाजा करायचा नाही. ज्यांना या संकटकाळात खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी आम्ही मदत करत आहोत. ही फक्त सुरुवात आहे. कोरोनाची दुसरी लाट एवढी भयंकर आहे की, हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळणेही अवघड झाले आहे आणि हे अकाल्पनीक आहे. म्हणूनच माझ्या फॉलोअर्सचा स्वयंसेवक म्हणून उपयोग करून घेताना अधिक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.''
विहारी इंग्लिश कौंटीत वॉर्विकशर क्लबकडून खेळतोय. ''जी लोकं प्लाझ्मा, बेड्स किंवा आवश्यक औषधांची व्यवस्था करू शकत नाहीत, अशा लोकांपर्यंत पोहोचणे हे माझं लक्ष्य आहे. पण, हा पर्याय नाही आणि भविष्यात मला अधिक सेवा करायची आहे. मी स्वतः एक टीम तयार केली आहे. लोकांना यातून प्रेरणा मिळतेय आणि मदतीसाठी पुढे येत आहेत. माझ्या व्हॉट्सअप ग्रूपमध्ये 100 लोकं आहेत आणि त्यांच्या मेहनतीमुळे मी मदत करत आहे. या ग्रुपमध्ये माझी पत्नी, बहिण व आंध्र प्रदेशातील काही खेळाडूंचाही समावेश आहे,''असेही तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत दुखापतग्रस्त असूनही विहारीने साडेतीन सात फलंदाजी केली. विहारीनं 12 कसोटीत 1 शतक व 4 अर्धशतकांसह 624 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 93 सामन्यांत 21 शतकं व 37 अर्धशतकांसह 7194 धावा केल्या आहेत.